आठवडाभरात सहा मोटारी-केबलची चोरी
प्रतिनिधी/ बेळगाव
सुळगा-हिंडलगा परिसरात विहिरीतील मोटर व केबल चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. गेल्या आठ दिवसांत सहा विहिरींवरील मोटारी चोरण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
केंबाळी नाला परिसरातील संतोष नाईक, रवी किणेकर यांच्यासह सुमारे सहा शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटारी, पाईप व केबल चोरण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी पाईपची नासधूस करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बेळगाव ग्रामीण पोलिसांना यासंबंधी माहिती दिली आहे.
बेळगाव शहर व तालुक्यात चोऱ्या, घरफोड्या, वाहनचोरीचे प्रकार वाढले असून चोरट्यांनी शेतकऱ्यांनाही लक्ष्य बनविले आहे. विहिरीवरील मोटारी, पाईप, केबल चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळून या परिसरात भयमुक्त वातावरण निर्माण करावे, अशी मागणी केली जात आहे.