मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय : दोन आठवडे चालणार अधिवेशन, खाणींवरील पंप न काढण्याच्या मिनेरांना सूचना,गरज भासल्यास राज्य सरकार नवे पंप बसविणार
प्रतिनिधी /पणजी
राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या दि. 11 जुलैपासून सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राज्य मंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर पर्वरीत विधानसभा संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. त्यावेळी साबांखामंत्री नीलेश काब्राल यांची उपस्थिती होती.
अधिवेशन किती दिवसांचे असेल असे विचारता त्यासंदर्भात नंतर निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र प्राप्त माहितीनुसार हे अधिवेशन दोन आठवडे चालण्याची शक्यता आहे.
खाणींवरील पंप न काढण्याचे निर्देश
राज्यातील खाणी पुढील महिन्यापर्यंत ताब्यात देण्याचे आदेश मिनेरांना दिल्याच्या पार्श्वभूमीवर आता संबंधित खाणींच्या पिटात मोठय़ा प्रमाणात पाणी भरण्याची शक्यता असल्याने त्यातून एखादी अप्रिय घटना घडून नागरिकांचा जीव व त्यांच्या मालमत्तेस धोका निर्माण होऊ नये यासाठी खाण कंपन्यांनी त्या ठिकाणाहून पाण्याचे पंप न काढण्याचे निर्देश दिले आहेत, असे पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गरज भासल्यास नवे पंप बसवणार
सरकारकडून खाणी ताब्यात देण्याचे आदेश आल्यानंतर काही कंपन्यांनी तेथील सामुग्रीसमवेत पाण्याचे पंपही काढून नेले आहेत. अशा कंपन्यांना आम्ही तेथील पंप सध्या न काढण्याची विनंती केली आहे, त्याचबरोबर पावसाळय़ात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी आपत्कालीन प्रसंगी गरज भासल्यास आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नवीन पंप बसवले जातील, पाईपही टाकले जातील आणि खाण पिटातील पाणी उपसण्यासाठी वीज जोडणी दिली जाईल, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
आग्वाद देखभाल कंत्राटदार निश्चित
गेल्या महिन्यात बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियममध्ये झालेल्या पाच दिवशीय नॅशनल पार्लामेंट इव्हेंटच्या खर्चास या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आग्वाद किल्ल्याच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी कंत्राटदाराची निवड निश्चित करण्यात आली. इनोव्हेटिव्ह मेडिकल टेक्नॉलॉजी व्हेंटिलेटरच्या उर्वरित 1.79 कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली.
गोमेकॉत एन्डोस्कोपी विभाग स्थापणार
वीज खात्यात एपीडीआरपी आयटी सपोर्ट सव्हिर्सिसला पुढील एका वर्षासाठी सेवावाढ देण्यात आली. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयात 52 पदांची निर्मिती करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. गोमेकॉत एन्डोस्कोपी विभाग स्थापन करण्यासाठी डॉ. अमित मायदेव यांच्या नियुक्तीस मंजुरी देण्यात आली.