पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केली पाहणी : कोल्हापूरवासीयांची मते जाणून घेणार : स्किल डेव्हलपमेंट सेंटरसह चित्रीकरण स्थळ आणि इतर गोष्टींचा स्मारकात समावेश करणे शक्य
कोल्हापूर / प्रतिनिधी
ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेत लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचे जिवंत स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी कोल्हापूरवासीयांची मते जाणून घेतली जातील, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. या स्मारकात स्किल डेव्हलपमेंट सेंटर, चित्रीकरण स्थळाची उभारणी करण्याच्या दृष्टीनेही विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : दोन महिन्यांत शहराचा कायापालट करा
पालकमंत्री केसरकर यांनी गुरूवारी त्यांनी शाहू मिलला भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मिल विषयी माहिती दिली. पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले, कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, ताराराणी यांचा वारसा आहे. हा वारसा लोकांसमोर गेला पाहिजे. शाहू मिलमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर, चित्रीकरण स्थळ आणि कोल्हापूरातील सर्व गोष्टी एकत्र आणून याठिकाणी शाहूंचे जिवंत स्मारक झाले पाहिजे. यासाठी कोल्हापूरच्या जनतेची मते जाणून घ्यायची आहेत, असेही केसरकर म्हणाले.
गोशाळा, मंदिरात दर्शन घेण्यात गैर काय?
आत्मश्वास नसला की हात दाखवायला ज्योतिषाकडे जातात असे टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मारला होता, त्यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी शिर्डी येथील गोशाळेला मदत केल्याने संबंधितांनी त्यांना भेटीचे निमंत्रण दिले होते. तिथे शंकराचे मंदिरही आहे. गोशाळा आणि मंदिरात दर्शन घेण्यात गैर काय? अशी विचारणा करत पवार कधी मंदिरात जात नाहीत का? असा सवाल त्यांनी केला.
शिंदे गटाचे आमदार शनिवारी आसामला जाणार
आसामधील कामाख्या देवीच्या आशिर्वादाने हे सरकार आले आहे. यामुळे त्या देवीवर श्रध्दा असल्याने शिंदे गटाचे सर्व आमदार 26 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली.