चालू अधिवेशन काळासाठी कारवाई ः सभागृहात व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अधिवेशनाच्या कामकाजाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल काँग्रेस सदस्या रजनी पाटील यांना चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुढील कार्यकाळासाठी शुक्रवारी निलंबित करण्यात आले. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी राज्यसभा या वरि÷ सभागृहात याची घोषणा केली. रजनी पाटील यांनी सभागृहाच्या कालच्या कामकाजाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ट्विटरवर टाकल्याचे सांगत ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप सदस्य जीव्हीएल नरसिंह राव यांनी काँग्रेस सदस्याच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. काँग्रेस सदस्यांनी कृतीचा निर्णय घेण्यापूर्वी अध्यक्षांना या समस्येचे परीक्षण करून चौकशी करण्याची विनंती केली. मात्र, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासह भाजप सदस्यांनी कारवाई झालीच पाहिजे, असा आग्रह धरला. या मुद्यावर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, सभागृहनेते पियुष गोयल यांच्यासह विविध पक्षांच्या अनेक सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अध्यक्षांनी निलंबनाची घोषणा केली. संसदीय विशेषाधिकार समितीचा अहवाल प्रलंबित ठेवून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी पाटील यांना निलंबित केल्याची घोषणा त्यांनी केली. सभापतींच्या या घोषणेनंतर काँग्रेस सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला.