मृतांचा आकडा जवळपास 12 हजारांवर ः ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारताने पाठवली मदत
अंकारा / वृत्तसंस्था
तुर्कस्तान आणि सीरियात भूकंपामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत एकूण 11 हजार 250 लोकांचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली. बळींच्या आकडय़ात झपाटय़ाने वाढ होत असून हा आकडा 20 हजारांवर पोहोचेल असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. तसेच जखमींचा आकडा 35 हजारांच्या पुढे गेला आहे. दोन्ही देशांना मदत करण्यासाठी 70 हून अधिक देश पुढे आले आहेत. ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारतानेही दोन्ही देशांना मदत पाठवली आहे. भारताने तुर्कस्तानमध्ये बचावकार्यासाठी एनडीआरएफ टीमसह गरूडा एरोस्पेस कंपनीचे ड्रोन पाठवले आहेत.
तुर्कस्तानमध्ये आठ हजारांहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला असून 34 हजार 810 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच सीरियामध्ये जवळपास 3 हजार लोक मृत्युमुखी पडले असून 3,800 हून अधिक लोक जखमी झाले. मृतांचा आकडा 20 हजारांच्या पुढे जाऊ शकतो, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. या मोठय़ा नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना आपत्कालीन सेवा दलांना बचावकार्यात खूप अडचणी येत आहेत.
तुर्कीमध्ये 8 हजार लोकांना वाचवण्यात यश आले आहे. बचावकार्यासाठी 24 हजारांहून अधिक बचावकर्ते तैनात करण्यात आले आहेत. येथे सुमारे 3 लाख 80 हजार लोकांनी सरकारी निवारा आणि हॉटेलमध्ये आश्रय घेतला आहे. तुर्कीतील अनेक शहरांमध्ये तापमान 9 ते उणे 2 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत लोकांना हायपोथर्मियाचा धोका असल्याचे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. हायपोथर्मियामध्ये शरीरात उष्णता निर्माण होत नसल्यामुळे शरीराचे तापमान वेगाने कमी होऊ लागते. या धोक्यामुळे मदत व बचावकार्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. बर्फवृष्टी आणि पावसामुळे भूकंपग्रस्त दोन्ही देशांमध्ये बचाव कार्यावर परिणाम होत असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.
सोमवारी सकाळी हादरा बसलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्किये होता. या आपत्तीनंतर येथील टेक्टोनिक प्लेट्स 10 फूट (3 मीटर) वर सरकल्याचे तज्ञ सांगतात. वास्तविक, तुर्की 3 टेक्टोनिक प्लेट्सच्या मध्ये वसलेले आहे. ऍनाटोलियन टेक्टोनिक प्लेट आणि अरेबियन प्लेट एकमेकांपासून 225 किलोमीटर दूर सरकल्या आहेत. या स्थितीमुळे तुर्कस्तान आपल्या भौगोलिक ठिकाणापासून 10 फूट सरकले आहे. टेक्टोनिक प्लेट्समधील या बदलामुळे तुर्की सीरियापेक्षा 5 ते 6 मीटर (सुमारे 20 फूट) जास्त बुडाले असावे. येत्या काही दिवसांत सॅटेलाइट इमेजमधून अचूक माहिती मिळणार आहे, असे इटलीचे भूकंपशास्त्रज्ञ डॉ. कार्लो डोग्लिओनी यांनी सांगितले.
आपत्तीत एक भारतीय बेपत्ता
7.8 रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपानंतर तुर्कस्तान आणि सीरिया अजूनही दहशतीत आहे. इमारतींच्या ढिगाऱयाखाली मोठय़ा संख्येने दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न बचाव कर्मचारी करत आहेत. अनेक देशांनी सीरिया आणि तुर्कस्तानमध्ये आपली मदत आणि बचाव पथके पाठवली आहेत. 24,400 हून अधिक आपत्कालीन कर्मचारी तुर्कीच्या बचावकार्यात गुंतले आहेत. दरम्यान, या आपत्तीमध्ये एक भारतीय बेपत्ता असून दहाहून अधिक जण वेगवेगळय़ा ठिकाणी अडकल्याची माहिती बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आली.
भारताकडून मदतीचा हात
विनाशकारी भूकंपामुळे भूकंपग्रस्त भागात ढिगाऱयाखाली दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी भारताने दोन्ही देशांकडे विविध उपकरणे पाठवली आहेत. भारताने पाठवलेल्या शोध आणि बचाव कर्मचाऱयांचा एक गट मदतकार्यात गुंतला आहे. विशेष प्रशिक्षित श्वान पथक, ड्रिल मशीन, मदत सामग्री आणि औषधे घेऊन भारतीय पथक एडन, तुर्की येथे दाखल झाले. भारताकडून तातडीने पाठवलेल्या या मदतीबद्दल तुर्कीने आभार मानले आहेत. भूकंपानंतर काही तासांतच भारताने या संकटात मदत करण्यासाठी तत्काळ पावले उचलली आणि बचाव पथके तुर्कीला पाठवण्याचा निर्णय घेतला. आता आपण तुर्कीमध्ये भारतीय पथक प्रत्यक्ष बचावकार्यात मदत करताना पाहू शकतो, असे तुर्कस्तानचे भारतातील राजदूत फिरात सुनेल यांनी सांगितले.