‘रेनबो’ चित्रपटाची अभिनेत्रीकडून घोषणा
अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या पुढील चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. आता अभिनेत्रीने चाहत्यांना खूषखबर दिली आहे. ‘पुष्पाः द राइज’, ‘द वरिसु’, ‘डियर कॉम्रेड’ आणि ‘गुडबाय’ यासारख्या विविध चित्रपटांमध्ये काम केल्यावर रश्मिकाने आता स्वतःच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘रेनबो’ असून रश्मिकाचा हा पहिलाच महिलाकेंद्रीत चिप्तपट असणार आहे.
रश्मिकाने ‘रेनबो’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. रेनबो म्हणजे जीवनाचे विविध रंग, हा चित्रपट माझ्यासाठी अत्यंत खास आहे. प्रेक्षकांचे आशीर्वाद अन् प्रेम मिळेल अशी अपेक्षा असल्याचे रश्मिकाने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. या चित्रपटात अभिनेता देव मोहन मुख्य भूमिका साकारणार असल्याचे समजते. या चित्रपटाचे चित्रिकरण शुक्रवारपासून हैदराबाद येथे सुरू होणार आहे.
‘रेनबो’ हा रोमँटिक धाटणीचा चित्रपट असून याची निर्मिती ड्रीम वॉरियर्स पिक्चर्स करणार आहे. पहिल्यांदाच मी एखाद्या महिला केंद्रीत चित्रपटात अभिनय करत आहेत. याची कहाणी एका युवतीच्या दृष्टीकोनातून सादर करण्यात येणार आहे. यातील व्यक्तिरेखा जिवंत करण्यासाठी मी उत्साही असल्याचे रश्मिकाने म्हटले आहे.
रश्मिका लवकरच ‘ऍनिमल’ या चित्रपटात रणवीर कपूरसोबत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगाकडून करण्यात आले आहे. ऍनिमल हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.