हिंडेनबर्गच्या अहवालानंतर सकारात्मक वातावरण ः आता रेटिंग एजन्सी मूडीज-फिचचे अदानींवर भाकीत
प्रतिनिधी/ नवी दिल्ली
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाला गेल्या आठ व्यापारी दिवसांत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. याचा फटका म्हणजे त्यांची संपत्ती ही जवळपास निम्म्याने कमी झाली, परंतु आता ते पुनरागमन करत आहेत.
अदानींच्या समभागांमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. त्याचवेळी रेटिंग एजन्सींनीही अदानी समूहाबाबत समाधानकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अदानी समूहाच्या कर्जाबाबत मूडीज आणि फिच या दोन्ही कंपन्यांनी आपले अहवाल दिले आहेत. त्यांनी सांगितले की, अदानी समूहाच्या कंपन्यांनी भारतीय बँकांकडून घेतलेली कर्जे त्यांच्या पत गुणवत्तेला धोका निर्माण करण्याइतकी जास्त नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
समूहाच्या कर्जावर रेटिंग एजन्सींचे भाकीत
फिच आणि मूडीज या पतमानांकन संस्थांनी मंगळवारी सांगितले की, भारतीय बँकांनी अदानी समूहाच्या कंपन्यांना दिलेली कर्जे त्यांच्या पत गुणवत्तेला धोका निर्माण करू शकत नाहीत. यासोबतच, गरज पडल्यास बँकांना असाधारण सरकारी मदतीची अपेक्षा लक्षात घेऊन बँक रेटिंग सेट केले असतात असे दोन्ही रेटिंग एजन्सींनी सांगत एकप्रकारे यायोगे दिलासा दिला आहे.
या संदर्भात, फिच रेटिंग्सने एका निवेदनात म्हटले आहे की, अदानी समूहाने भारतीय बँकांकडून कर्ज घेतलेले असले तरी त्यातून कोणताही ठोस धोका निर्माण होणार नाही. फिचने म्हटले आहे की, अदानी समूहाचा बराचसा भाग तणावाखाली येत असल्याच्या काल्पनिक परिस्थितीतही, भारतीय बँकांची पत जोखीम आटोपशीर असेल आणि या बँकांच्या व्यवहाराच्या रेटिंगवर कोणतेही प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे.