चिपळूण/प्रतिनिधी
दीड महिन्यापूर्वी लग्न झालेल्या 19 वर्षीय विवाहितेने पेढांबे येथील माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
धनश्री महेश थोरात (उंब्रज, ता. कराड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या बाबतची खबर यल्लावा लक्ष्मण पवार (65, पेढांबे) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री थोरात हिने दीड महिन्यापूर्वी महेश महादेव थोरात (उंब्रज, ता. कराड) याच्याशी लग्न केल्याचे तिने घरी कळवले होते. धनश्री हिच्या आईच्या एस.आय.पी.च्या कागदपत्रावर तिची सही लागणार असल्याने तिला फोन करुन पेढांबे येथील माहेरी बोलावले होते. त्यानुसार धनश्री 10 जुलैला पेढांबे येथे माहेरी आली होती. ती 11 जुलै रोजी जेवण करुन तिच्या खोलीत गेली असता तिने नायलॉनच्या ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे.