आयपीएल साखळी फेरीत पाचवा लक्षवेधी विजय, प्रतिस्पर्धी लखनौ सुपरजायंट्सला 18 धावांनी नमवले
नवी मुंबई / वृत्तसंस्था
कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसचा 96 धावांचा झंझावात आणि स्पीडस्टार जोश हॅझलवूडने 25 धावांमध्येच 4 फलंदाज गारद केल्यानंतर आरसीबीने आयपीएल साखळी सामन्यात लखनौ सुपरजायंट्सला 18 धावांनी पराभवाचा धक्का दिला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 181 धावा केल्या तर प्रत्युत्तरात लखनौ सुपरजायंट्सला 20 षटकात 8 बाद 163 धावांवर समाधान मानावे लागले.
विजयासाठी 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचे आघाडीवीर अपयशी ठरले आणि इथेच त्यांची मोठी पिछेहाट झाली. डी कॉक (3) व मनीष पांडे (6) स्वस्तात परतल्यानंतर केएल राहुल (30), कृणाल पंडय़ा (42) यांनी तिसऱया गडय़ासाठी 31 धावा जोडल्या. मात्र, हे दोघे फलंदाज बाद झाल्यानंतर ठरावीक अंतराने गडी परतण्याचा सिलसिलाच सुरु झाला आणि लखनौचा संघ यातून शेवटपर्यंत सावरु शकला नाही.
प्लेसिसचा 96 धावांचा झंझावात
प्रारंभी, कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसने 96 धावांची डरकाळी फोडणारी खेळी साकारल्यानंतर आरसीबीने 6 बाद 181 धावांपर्यंत मजल मारली. या हंगामातील पहिल्या लढतीत 88 धावांची आतषबाजी केल्यानंतर प्लेसिसला मोठी खेळी साकारता आली नव्हती. येथे मात्र त्याने ही कसर उत्तमरित्या भरुन काढत 64 चेंडूत 96 धावा चोपल्या. त्याच्या या लक्षवेधी खेळीत 11 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला.
डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवरील या लढतीत लखनौ सुपरजायंट्सने नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि लखनौच्या गोलंदाजांनी ठरावीक अंतराने गडी बाद केले. प्लेसिसच्या आक्रमणावर मात्र लखनौकडे काहीच पर्याय नव्हता.
लंकन पेसर दुष्मंता चमीराने (3 षटकात 2-31) आपल्या पहिल्या षटकात सलामीवीर अनुज रावत (4) व विराट कोहली (0) यांना लागोपाठ चेंडूंवर बाद करत जबरदस्त धक्के दिले. ग्लेन मॅक्सवेल (23) सेट झाला आहे, असे वाटत असतानाच कृणाल पंडय़ाच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावून बसला. जेसॉन होल्डरने हवेत झेपावत त्याचा अप्रतिम झेल टिपला. गोव्याचा युवा फलंदाज सुयश प्रभुदेसाई 10 धावांवर बाद झाला. नंतर डय़ू प्लेसिसने शाहबाज अहमदसमवेत (26) पाचव्या गडय़ासाठी 70 धावांची भागीदारी साकारली.
दिनेश कार्तिक (नाबाद 13) क्रीझवर आल्यानंतर प्लेसिसने फलंदाजीतील गियर बदलत फटकेबाजीवर भर दिला आणि आरसीबीने 180 धावांचा टप्पा गाठला. प्लेसिस यादरम्यान आपल्या पहिल्यावहिल्या आयपीएल शतकाच्या समीप आला. पण, नंतर डावातील एक चेंडू बाकी असताना होल्डरने त्याची खेळी संपुष्टात आणली. डीप बॅकवर्ड स्क्वेअरवरील स्टोईनिसने प्लेसिसचा झेल टिपला.
संक्षिप्त धावफलक
आरसीबी ः 20 षटकात 6 बाद 181 (फॅफ डय़ू प्लेसिस 64 चेंडूत 11 चौकार, 2 षटकारांसह 96, शाहबाज अहमद 22 चेंडूत 26, ग्लेन मॅक्सवेल 11 चेंडूत 23. अवांतर 9. चमीरा 2-31, होल्डर 2-25, कृणाल 1-29).
लखनौ सुपरजायंट्स ः 20 षटकात 8 बाद 163 (कृणाल पंडय़ा 28 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 42, केएल राहुल 24 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 30, स्टोईनिस 15 चेंडूत 24, होल्डर 9 चेंडूत 16. अवांतर 15. जोश हॅझलवूड 4 षटकात 4-25, हर्षल पटेल 4 षटकात 2-47, सिराज, मॅक्सवेल प्रत्येकी 1 बळी).
विराटला गोल्डन डकवर बाद करणारा चमीरा चौथा गोलंदाज
दुष्मंता चमीरा आयपीएल इतिहासात विराट कोहलीला गोल्डन डकवर बाद करणारा चौथा गोलंदाज ठरला. लंकन पेसर चमीराने कोहलीला बॅकवर्ड पॉईंटवरील दीपक हुडाकरवी झेलबाद केले. विराट यंदाच्या आयपीएल हंगामात फारसा बहरात राहिलेला नाही. चमीराने सलामीवीर अनुज रावतला बाद केल्यानंतर विराट क्रीझवर आला. मात्र, आपल्या पहिल्याच चेंडूवर विराटचा पुश करण्याचा प्रयत्न सपशेल फसला आणि आल्या पावली त्याला परतावे लागले. कोहलीला यापूर्वी 2008 मध्ये आशिष नेहरा, 2014 मध्ये संदीप शर्मा तर 2017 मध्ये नॅथन कोल्टर नाईलने गोल्डन डकवर बाद केले आहे. आता 5 वर्षांच्या कालावधीनंतर विराट गोल्डन डकवर बाद झाला आहे.
कोहली यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध 48 धावा केल्या आणि ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. अन्य लढतीत विराट अनुक्रमे 12, 5, 1 व 12 धावांवर बाद झाला आहे.
दिनेश कार्तिक 7 सामन्यात 6 वेळा नाबाद!
आरसीबीचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने यंदा 7 सामन्यात 210 धावा जमवल्या असून यात तो तब्बल 6 वेळा नाबाद राहिला आहे. आतापर्यंत झालेल्या 7 लढतीत कार्तिक फक्त चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध लढतीत बाद झाला.
या हंगामातील दिनेश कार्तिकचे योगदान
तारीख / प्रतिस्पर्धी संघ / धावा / चेंडू
27 मार्च / पंजाब किंग्स / नाबाद 32 / 14
30 मार्च / केकेआर / नाबाद 14 / 7
5 एप्रिल / राजस्थान / नाबाद 44 / 23
9 एप्रिल / मुंबई इंडियन्स / नाबाद 7 / 2
12 एप्रिल / चेन्नई / 34 वर बाद / 14
16 एप्रिल / दिल्ली / नाबाद 66 / 34
19 एप्रिल / लखनौ / नाबाद 13 / 8.