नॅशनल हेराल्डप्रकरणी 21 जुलैला होणार चौकशी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नॅशनल हेराल्ड प्रकरणी आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी होणार आहे. सोनिया गांधींना ईडीने समन्स बजावला आहे. ईडीने सोनिया गांधींना 21 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी सोनिया गांधींना 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी प्रकृतीचा दाखला देत चौकशीस हजर राहण्यापासून सूट देण्याची मागणी केली होती.
सोनिया गांधींना आता तिसऱयांदा नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची 5 दिवसांमध्ये 50 तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान त्यांना सुमारे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. तर सोनिया गांधी या कोरोनाबाधित झाल्याने त्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाल्या नव्हत्या. त्यानंतर त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते, परंतु त्यांनी प्रकृतीचे कारण देत मुदत मागितली होती.