एसटी महामंडळाकडून जाहिरात प्रसिद्ध; पुरोगामी युवक संघटनेचा खासगीकरणाला विरोध
कोल्हापूर प्रतिनिधी
एस टी महामंडळाच्या पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिह्याकरिता कंत्राटदारामार्फत 1050 वाहक पुरवण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. तीन वर्षांसाठी वाहकरूपी कर्मचारी पुरवठा करावा लागणार असल्याचे निविदेत नमूद केले आहे. यापूर्वी कंत्राटीपद्धतीने केलेली भरती ही एसटी महामंडळाने थेट स्वतः केली होती. यावेळी प्रथमच ती ठेकेदारामार्फत होणार आहे. यातून एसटी महामंडळाचे खासगीकरण करून ते भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेने केला आहे.
या संदर्भात पुरोगामी युवक संघटनेचे इंजिनिअर अभिजित कदम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे : एकीकडे शासनात विलिनीकरणसाठी एसटी कर्मचारी संघर्ष करत असताना दुसरीकडे खासगीकरणाचा घाट सुरु असल्याचे हे विदारक चित्र आहे. महाराष्ट्रभर अशाच प्रकारे ठेकेदारामार्फत चालक पुरवले गेल्यास भविष्यात एस टी महामंडळ भांडवलदारांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. याचा पुरोगामी युवक संघटना निषेध करत आहे. एस टी महामंडळाच्या खासगीकरणाचा डाव त्वरित थांबवावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही कदम यांनी दिला आहे.