दुसरे रेल्वेगेट परिसरात सकाळच्या सुमारास गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
मिरज-लोंढा या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण केले जात असल्याने रेल्वेगेट बंद ठेवले जात आहे. बुधवारी टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेट बंद ठेऊन दुरुस्तीचे काम सुरू होते. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत रेल्वेगेट बंद होते. यामुळे वाहनचालकांना दुसऱया व तिसऱया रेल्वेगेटचा वापर करावा लागला.
बुधवारी सकाळपासूनच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. पेव्हर्स काढून रेल्वेट्रक मोकळा करण्यात आला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱयांकडून दिवसभर दुरुस्तीचे काम सुरू होते. अनेक कर्मचारी व मशिनरीच्या साहाय्याने ट्रकचे काम सुरू होते. दुपदरीकरणासह विद्युतीकरणासाठी करण्यात येणारे बदल दुरुस्तीद्वारे करण्यात येत होते. यामुळे दिवसभर रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले होते. रात्री उशिरा काम पूर्ण झाल्यानंतर गेट सुरू होईल, असे कर्मचाऱयांकडून सांगण्यात येत होते.
यामुळे दुसरे रेल्वेगेट परिसरात सकाळच्या सुमारास गर्दी झाली होती. उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतीत कामाला जाणारे कामगार, शालेय विद्यार्थी यामुळे सकाळी 8 ते 10 या वेळेत काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दुसरे रेल्वेगेट येथे तैनात असलेल्या रहदारी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.