बेळगाव : केएलई परिसरात भटकणाऱ्या कुत्र्याने खाद्यपदार्थ खाण्यासाठी प्लास्टिकच्या बरणीमध्ये तोंड घातले. त्यामुळे त्या कुत्र्याचे तोंड त्यामध्ये अडकून पडले. सदर कुत्रे परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपाकडे तक्रार केल्यानंतर तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर मनपाच्या पथकाने कुत्र्याची सुटका केली.
खाद्यपदार्थ शोधत फिरणारी कुत्री कोणत्या अडचणीत येतील हे सांगता येत नाही. पण मूक जनावर असल्याने काही ठिकाणी अडकून पडतात. असेच एका कुत्र्याने केएलई रुग्णालय परिसरात भटकत असताना खाद्यपदार्थ खाण्यासाठी बरणीमध्ये तोंड घातले. त्यामध्ये त्याचे तोंड अडकुन राहिले. बरणीतून तोंड बाहेर काढण्यासाठी बराच प्रयत्न केला, पण काढता आले नाही.
ही घटना पाहणाऱ्या नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली. महापालिकेच्या पशु संगोपन विभागाचे राजू संकण्णावर यांनी मनपाच्या पथकासह दाखल होऊन कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण कामगारांच्या धास्तीने सदर कुत्रे पळुन जात होते. त्यामुळे कुत्रे पकडणाऱ्या कामगारांना पाचारण करण्यात आले. त्या कामगारांनी जाळी टाकून कुत्र्याला पकडले. तब्बल तीन तासाच्या परिश्रमानंतर कुत्र्याची सुटका डब्यामधून करण्यात आली.