विषारी हवा फुफ्फुसांसह मेंदूला नुकसान पोहोचवतेय
हवा प्रदूषणामुळे केवळ फुफ्फुसं नव्हे तर मेंदूलाही धोका असतो. जामा जर्नलमध्ये प्रकाशित अध्ययनानुसार दीर्घ काळापर्यंत विषारी वातावरणात श्वास घेतल्यावर तुम्हाला नैराश्याला सामोरे जावे लागू शकते. म्हणजेच वायू प्रदूषण लोकांच्या मानसिक आरोग्यालाही बिघडवत आहे.
नेटवर्क ओपन जर्नलच्या संशोधनानुसार दीर्घकाळापर्यंत खराब हवेच्या सान्निध्यात राहिल्यास लोकांमध्ये नैराश्याची लक्षणे दिसून येत आहेत. हा प्रकार प्रामुख्याने वृद्धांमध्ये अधिक दिसून येत आहे. तर जमा सायकियाट्री जर्नलच्या संशोधनात वैज्ञानिकांनी हवेतील दूषित कणांच्या कमी प्रमाणातही लोकांना नैराश्य आणि एंक्झाइटी होऊ शकते असे सांगितले आहे.
वृद्धांवर झाले संशोधन
दुसऱया संशोधनात 64 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वृद्धांना सामील करण्यात आले. हे सर्व वृद्ध अमेरिकेत राहणारे होते. संशोधकांनुसार 2005-16 दरम्यान 90 लाखांपैकी 15.2 लाख वृद्धांमध्ये नैराश्याची लक्षणे दिसून आली. दीर्घकाळापर्यंत प्रदूषित वातावरणात राहिल्याने हे घडले आहे. लोकांमध्ये एका ठराविक वयानंतर ही लक्षणे दिसून येत असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
वाहतूक कोंडी, ऊर्जा प्रकल्पाचे प्रदूषण धोकादायक
ज्या दूषित कणांमुळे लोकांमध्ये नैराश्य दिसून येत आहे, त्यात वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण, धूळ, धूर, नायट्रोजन डाय-ऑक्साइड, ऊर्जा प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण इत्यादी सामील आहे. तरुणाईमध्येही याचा प्रभाव दिसून येऊ शकतो असे संशोधकांचे म्हणणे आहे. हवा प्रदूषणामुळे स्मरणशक्ती कमकुवत होणे, शारीरिक आजार होणे आणि मृत्यू होण्याचाही धोका आहे.
मेंटल डिसऑर्डरचा धोका
पहिल्या अध्ययनात ब्रिटन आणि चीनच्या 3 लाख 90 हजार लोकांना सामील करण्यात आले. त्यांच्या आरोग्याचे 11 वर्षांपर्यंत निरीक्षण करण्यात आले. ब्रिटनमध्ये वायू गुणवत्ता खराब झाल्यावर लोकांमध्ये नैराश्य आणि एंक्झाइटीची लक्षणे दिसून आली. वाढत्या वयासह लोकांमध्ये खराब हवेमुळे मेंटल डिसऑर्डर्सचा धोका निर्माण होतो असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.