नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी आणि सचिन पायलट यांच्यात जवळपास दीड तास बैठक चालली. या बैठकीत राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. पायलट यांनी राज्यातील राजकीय घडामोडींबाबत सोनिया गांधींना माहिती दिली आहे. सध्या सचिन पायलट यांच्याकडे काँग्रेसचे कोणतेही जबाबदारीचे पद नाही. पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी नि÷ने पार पाडणार असल्याचे पायलट यांनी बैठकीनंतर सांगितले.
सोनियांसोबत जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीत 2023 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना आणि त्यामध्ये सचिन पायलट यांच्या जबाबदारीबाबत चर्चा करण्यात आली. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होत असतो. सत्ताबदलाचा हा ट्रेंड यंदा काँग्रेसला तोडायचा असल्यामुळे राज्यातील सर्व नेत्यांना एकत्रितपणे काम करावे लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी राजस्थानसाठी काँग्रेसकडून एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर योग्य ती पावले उचलण्यात आली. या समितीच्या निर्णयानुसार, काम करावे लागणार असून 2023 मधील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकत्रितपणे काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.