मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार
प्रतिनिधी /मडगाव
‘श्रद्धा व सबुरी’ या दोनच शब्दांनी श्री साईबाबांनी संपूर्ण जगाला आपल्याकडे आकर्षित केले. साईबाबांनी सर्वांना श्रद्धेने व सबुरीने वागविले. आज त्यांची मंदिरे देशात गावोगावी तसेच विदेशातही साकारली आहेत. साईनगर-घोगळ, फातोर्डा येथे श्री साईबाबांच्या नूतन मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देवस्थानचे अध्यक्ष दामू नाईक यांनी उपलब्ध करून दिली. हे आपण आपले भाग्य समजतो असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
साईनगर-घोगळ, फातोर्डा येथे श्री साईबाबांच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या निमित्त आयोजित केलेल्या सत्कार सोहळय़ाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. साईनगर-घोगळ येथील साई मंदिरात गेली 12 वर्षे आपली सेवा दिली. त्यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, सर्वानंद भगत, नगरसेवक सदानंद नाईक, बबिता नाईक, श्वेता लोटलीकर तसेच देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे बोलताना म्हणाले की, आज इतिहास माहिती असणे जसे महत्वाचे आहे तसेच आपली संस्कृती टिकवून ठेवणे देखील तेव्हढेच महत्वाचे आहे. मंदिराच्या माध्यमांतून आम्ही आमची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सदोदीत कार्यरत राहतो. आपल्यामध्ये मतभेद असले तरी मंदिरात पोचल्यावर आम्ही सर्वजण एकोप्याने कार्यात सहभागी होतो. हीच खरी आपली संस्कृती आहे आणि मंदिराच्या माध्यमांतून ती जोपासली जात आहे.
या वेळी नूतन साईबाबा मूर्तीचे शिल्पकार प्रदीप भारद्वाज (जयपूर-राजस्थान), ईश्वर भट (पुरोहित), श्रीमती प्रेमावती प्रेमानंद नाईक, बाबनी प्रेमानंद नाईक, पप्पू शर्मा, नस्सिर कनोर, तुळशीदास नाईक व अनिल रहेजा यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला देवस्थान समितीचे अध्यक्ष दामू नाईक यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वल्लभदास रायकर यांनी केले. त्यानंतर युवा गायक कलाकार स्वप्नील बांदोडकर व साथीचा ‘राधा ही बावरी’ हा संगीताचा कार्यक्रम झाला.
नतून मूर्ती प्रतिष्ठापना सोहळय़ाला भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आमदार उल्हास तुयेकर, माजी खा. ऍड. नरेंद्र सावईकर, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश रवी नाईक, मडगाव पालिकेचे नगरसेवक, सरकारी अधिकारी प्रसन्न आचार्य, पोलीस अधिकारी तसेच साईबाबांच्या भक्तांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून तीर्थ-प्रसादाचा लाभ घेतला. साईबाबांच्या नूतन मूर्तीचे दर्शन घेणाऱयामध्ये भाजपचे महामंत्री सतीश धोंड, खा. विनय तेंडुलकर, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार दाजी साळकर, माजी आमदार वासुदेव मेंग गांवकर इत्यादीचा समावेश होता.