प्रस्ताव तयार असून सरकारच्या संमतीच्या प्रतिक्षेत
पणजी : राज्यातील नगराध्यक्ष व नगरसेवक लवकरच मालामाल होणार असल्याची चिन्हे दिसत असून त्यांचे महिन्याचे मानधन दुप्पट करण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. हा प्रस्ताव लवकरच मान्य होऊन त्यांच्या मानधनात भरघोस वाढ होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. गोव्यातील नगरपालिकांची तीन गटांत वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार ए बी व सी अशा तीन गटातील पालिकांच्या अध्यक्षांना यापुढे प्रतीमहिना अनुक्रमे रु. 25,000, रु. 2,0000 आणि रु. 20,000 असे मानधन देण्याचा उल्लेख प्रस्तावातून करण्यात आला आहे. सध्या त्यांना प्रतीमहिना रु. 12,825, रु. 11,475 व रु. 10,800 असे मानधन मिळते. प्रस्तावित माधन पाहिले तर ते दुप्पट होणार असे स्पष्टपणे दिसून येते. तिन्ही गटातील पालिकांच्या नगरसेवकांना रु. 18,000 इतके मानधन मिळणार आहे. सध्या त्यांना रु. 9000 ते रु. 10,000 असे मानधन मिळते. त्यांच्याही मानधनात घसघशीत वाढ होणार आहे. सांखळी, फोंडा पालिका निवडणूक झाल्यानंतर हा प्रस्ताव आणण्यात आला आहे. तो मान्य होणार हे निश्चित असून जे नव्याने नगरसेवक झाले आहेत त्यांना या वाढीव मानधनाचा लाभ होणार आहे. या वाढीव मानधनामुळे यापुढे नगरसेवक होण्यासाठी स्पर्धा लागेल, असे चित्र दिसून येणार आहे.