प्रतिनिधी /बेळगाव
गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम रविवारी मारुती देवस्थान सारस्वत भवन खडेबाजार शहापूर येथे झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या हेरवाडकर हायस्कूलच्या बालवाडी विभागप्रमुख शर्मिला देशपांडे, समाजाचे अध्यक्ष सुनील नाईक, उपाध्यक्षा यशश्री देशपांडे, सेक्रेटरी राघव हेरेकर आणि विश्वस्त बालमुकुंद पतकी उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सुनील नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यशश्री देशपांडे यांनी प्रमुख पाहुण्या शर्मिला देशपांडे यांचे भेटवस्तू देऊन स्वागत केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शर्मिला देशपांडे यांनी ‘तुमचे आई-वडील अतिशय कष्टपूर्वक तुम्हाला शिकवितात. तेव्हा तुम्ही मन लावून भरपूर अभ्यास करा आणि परीक्षेत घवघवीत यश मिळवा’ असे सांगितले.
यावेळी एकूण 76 विद्यार्थ्यांना 1 लाख 7 हजार रु. च्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. आज समाजाकडून मिळालेली मदत हे समाजाचे ऋण समजून शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी समाजाला देणगी देऊन ऋण फेडावे, असे आवाहन सेक्रेटरी राघव हेरेकर यांनी केले.
सूत्रसंचालन करून संध्या सडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला दै. तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री, समाजाचे कार्यकारिणी सदस्य, विश्वस्त आणि समाजबांधव उपस्थित होते.