आपल्याकडे ‘शोधा म्हणजे सापडेल’ असा एक वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ असा की प्रयत्न केल्यास यश मिळते. या मराठी म्हणीचा आनंददायक प्रत्यय नॉर्वेतील एका कुटुंबाला काहीशा वेगळ्या प्रकारे आल्याची घटना घडली आहे. या कुटुंबातील छोट्या मुलीच्या कानातील डूल काही दिवसांपूर्वी हरविले होते. ते शोधण्यासाठी या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने संपूर्ण घर पालथे घातले.
घरात डूल न सापडल्याने त्यांनी ते घराच्या बागेत शोध सुरु केला. बागेत डूल शोधताना त्यांनी धातूशोधक उपकरणाचे (मेटल डिटेक्टर) साहाय्य घेतले. बराच शोध घेतल्यानंतर त्यांच्या हाती जे लागले ते अविश्वसनीय होते. आपल्या बागेत पुरातन वायकिंग राजघराण्याच्या काळातील गुप्तधनाचा शोध लागला. या अनपेक्षित लाभाने हे कुटुंब अक्षरश: आश्चर्यचकित होऊन गेले होते. अर्थात हे गुप्तधन सोने किंवा सोन्याच्या नाण्यांच्या स्वरुपात नव्हते. तर ते होते पुरातन वस्तूंच्या स्वरुपात, ज्या वस्तूंची आजची किंमत लक्षावधी डॉलर्स होऊ शकेल, असे तज्ञांचे मत आहे.
बागेतील एका झाडाखाली शोध घेताना त्यांना वायकिंगच्या काळातील एका कबरीचा शोध लागला. या कबरीत पुरातन कास्य आभूषणे गवसली. या आभूषणांवर कधीकाळी सोन्याचे पाणी चढविले होते, असे तज्ञांचे मत आहे. आज या आभूषणांची किंमत सोन्याहूनही अधिक आहे. वायकिंग कालावधी इसवीसन 793 ते इसवीसन 1066 असा आहे. याचाच अर्थ असा की ही आभूषणे किमान एक सहस्र वर्षांपूर्वीची आहेत. त्यांच्या आजच्या किंमतीप्रमाणे त्यांचे ऐतिहासिक महत्वही अमूल्य असेच आहे. या कुटुंबाला त्या मुलाचा डूल सापडला की नाही, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. तथापि, जे सापडले ते अनपेक्षित अन् अद्भूत आहे