प्रतिनिधी /बेळगाव
सुवर्ण विधानसौधसमोर शुक्रवारी ओब्बव्वा आत्मरक्षण कला-कराटे प्रदर्शन झाले. स्वत: मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शाळकरी मुलींच्या कवायती पाहिल्या. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
समाज कल्याण खाते, मागासवर्गीय खाते, अनुसूचित जाती खाते व कर्नाटक निवासी शिक्षण संस्था संघटना, बेंगळूर येथील ख्रिस्त निवासी शाळेतील विद्यार्थिनींनी कराटेची प्रात्यक्षिके करून दाखविली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, पुढील शैक्षणिक वर्षापासून योगाबरोबरच मुलींसाठी आत्मसंरक्षणाचे अल्पावधी कोर्स सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. सर्व शिक्षण संस्थात अल्पावधी कोर्स सुरू करण्याची गरज आहे. पीयुसीपासून हे कोर्स शिकविणे योग्य ठरणार आहे. लवकरच यासंबंधी एक निर्णय घेण्यात येणार आहे.
आत्मसंरक्षण प्रत्येक नागरिकासाठी जरुरीचे आहे. आपण मुख्यमंत्री असताना काही निर्णय घेतले होते. मुलींना कराटे प्रशिक्षण देण्याचा निर्णय त्याचवेळी झाला होता. गेल्या वर्षभरात मुलींना उत्तम प्रशिक्षण देण्यात आले आहे. ज्या मुलींनी कराटे शिकले आहे, त्यांनी इतरांना आत्मसंरक्षणाचे धडे द्यावेत. ग्रामीण महिला, नोकरदार महिला, शाळा-कॉलेजच्या विद्यार्थिनींनी कराटे शिकण्याची गरज आहे. आत्मसंरक्षणाची कला अवगत असेल तर समाजही सुरक्षित होतो. सातशे कोटी रुपये खर्चातून निर्भया योजना राबविण्यात येत आहे. सर्व शहरात या योजनेचा विस्तार करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. भव्य भारताच्या विकासासाठी आपले योगदान देत आहेत. कराटेतील मुलींचे कौशल्य पाहता कित्तूर चन्नम्मा, ओणके ओब्बव्वा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, केळदी चन्नम्मांप्रमाणे देशात एक सक्षम महिलांची फळी उभी रहात असल्याचे जाणवते. यावेळी विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी, समाजकल्याण मंत्री कोट श्रीनिवास पुजारी, कायदा व संसदीय व्यवहारमंत्री माधुस्वामी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.