निफ्टी 2023 मध्ये प्रथमच 18700 च्या टप्प्यावर : ब्रिटानिया नफ्यात
मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीमध्ये घेण्यात आलेले निर्णय समोर येण्याच्या अगोदरच भारतीय भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात मजबूत तेजीची स्थिती दिसून आली आहे. यामध्ये निफ्टी निर्देशांक पहिल्यांदाच 18,700 च्या टप्प्यावर पोहोचला आहे.
50 समभागांच्या आधारे हा निर्देशांक 127.40 अंकांनी वधारुन निर्देशांक 18,726.40 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला सेन्सेक्स 350.08 अंकांनी वधारुन निर्देशांक 63,142.96 वर बंद झाला आहे. यासोबतच बुधवारी सेन्सेक्स 63,000 च्या घरात पोहोचला आहे. बुधवारी तिसऱ्या सत्रात व्होडाफोन आयडियाचे समभाग हे 8.51 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. यावेळी निफ्टीमधील ब्रिटानियाचे समभागही 4.17 टक्क्यांनी तेजीत राहिले आहे.
या क्षेत्रांची कामगिरी..
सर्व क्षेत्रांची कामगिरी सकारात्मक राहिली असून यामध्ये कॅपिटल गुड्स, धातू, ऑईल आणि एफएमसीजी, पॉवर, रियल इस्टेट यांचे समभाग हे 1 टक्क्यांपेक्षा अधिकच्या टक्केवारीने तेजीत राहिले आहेत. यावेळी बीएसईमधील मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक हे प्रत्येकी 1 टक्क्यांनी वधारले आहेत.
सेन्सेक्समध्ये नेस्ले इंडियाचे समभाग सर्वाधिक 2.97 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच टाटा स्टील 2.29 टक्के, टाटा मोर्ट्स 2.21 आणि भारती एअरटेलचे समभाग हे 1.70 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. यासोबतच लार्सन अॅण्ड टुब्रो, पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, टायटन, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग वधारुन बंद झाले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँक, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग हे लाल निशाण्यासह बंद झाले आहेत. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये केंद्राने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. याचा परिणाम बाजारावर दिसला आहे. यामध्ये सरकारने एमएसपीमध्ये वाढ केली आहे. यासोबतच सरकारने बीएसएनएलकरीता 89,047 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. यामुळे याचा प्रभाव भारतीय बाजारात राहणार असल्याचे संकेतही व्यक्त केले जात आहेत.