बँक, धातू, रियल इस्टेट विक्रीचा प्रभाव : निफ्टी19,950 अंकांच्या खाली
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील बुधवारच्या सत्रात मुख्य क्षेत्रांमधील विक्रीच्या परिणामुळे बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत झाले आहेत. यामध्ये बँक, धातू, रियल इस्टेट यांच्यामधील विक्रीमुळे बाजारात घसरणीचा कल राहिला होता. सेन्सेक्स 796 अंकांनी म्हणजे 1.18 टक्क्यांनी कोसळला आहे. याचदरम्यान निफ्टीही नुकसानीत राहिली आहे.
प्रमुख कंपन्यांमधील विक्रीच्या दरम्यान भारतीय शेअर बाजारातील बीएसई सेन्सेक्स 796 अंकांनी कोसळून निर्देशांक 1.18 टक्क्यांसोबत 66,800.84 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 231.90 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 1.15 टक्क्यांसोबत 19,901.40 वर बंद झाला आहे.
निफ्टीमधील एचडीएफसी बँक, जेएसडब्लू स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, बीपीसीएल आणि स्टेट बँक लाईफ यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. तसेच पॉवरग्रिड कॉर्प, कोल इंडिया, ओएनजीसी यांचे समभाग हे सर्वाधिक तेजीत राहिल्याची नोंद केली आहे.
सेन्सेक्समधील समभागांची स्थिती
बीएसई सेन्सेक्समधील एचडीएफसी बँकेचे समभाग हे सर्वाधिक चार टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. याचदरम्यान जेएसडब्लू स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, मारुती सुझुकी, विप्रो, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, टायटन, लार्सन अॅण्ड टुब्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, स्टेट बँक आणि टाटा मोर्ट्स यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत. या व्यतिरिक्त आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि बजाज फायनान्स यांचे समभाग प्रभावीत झाले आहेत. दुसऱ्या बाजूला मात्र पॉवरग्रिड 2.32 टक्क्यांनी वधारले यासह एशियन पेन्ट्स, सनफार्मा, अॅक्सिस बँक यासह अन्य काही कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
प्रमुख क्षेत्रांची स्थिती
विविध क्षेत्रांपैकी पॉवर क्षेत्र वगळता अन्य सर्व क्षेत्रातील निर्देशांक हे प्रभावीत झाले आहेत. बँक, धातू आणि रियल इस्टेट यांचे निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरणीत राहिले. बीएसई मिडकॅप 0.30 टक्के आणि स्मॉलकॅपमध्ये 0.5 टक्क्यांची घसरण राहिली.
रुपया 19 पैशांनी मजबूत
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 19 पैशांनी मजबूत होत 83.08 वर बंद झाला आहे. या अगोदरच्या सत्रात रुपया 83.27 वर बंद झाला आहे.