सहा महिन्यांपूर्वी झाले उद्घाटन आता तरंगत्या जेटीसाठी निविदा
प्रतिनिधी / पणजी
सुमारे 4 कोटी ऊपये खर्च करून बांधण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या सोलर इलेक्ट्रीक हायब्रिड फेरीबोटीचे मोठा गाजावाजा करून उद्घाटन केल्यानंतर आता नदी परिवहन खात्याने तिच्यासाठी तरंगती जेटी बांधण्यासाठी निविदा जारी केली आहे. हा एकुण प्रकार म्हणजे ’आधी कळस मग पाया’ असाच ठरला असून ही जेटी तयार होईपर्यंत म्हणजे पुढील किमान सहा महिने तरी सदर फेरीबोट मार्गी लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गत वर्षी ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय बंदरे आणि जलवाहतूक मंत्र्यांच्या हस्ते या सोलर फेरीबोटीचे लोकार्पण करण्यात आले होते. पणजी-चोडण या मार्गावर ती चालविण्यात येणार होती. परंतु त्यासाठी लागणारी विशेष तरंगती जेटी केवळ पणजीतच तयार करण्यात आली आहे. दुसऱ्या टोकाला अर्थात चोडणच्या तिरावर जेटीची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजपर्यंत ती फेरीबोट बंदच ठेवण्यात आली आहे. ही निविदा सादर करण्यासाठी 20 जुलै पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होऊन यशस्वी बोलीदारास काम देण्यात येणार आहे. ही जेटी 100 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करावी लागणार आहे. तोपर्यंत किमान सहा महिने संपलेले असतील व त्यानंतर सरकारच्या सवडीनुसार उद्घाटनादी कार्यक्रम आटोपून प्रत्यक्ष वापर होईपर्यंत आणखी काही महिने लागतील. हा सर्व कालावधी जमेस धरता यंदाच्या वर्षात तरी सदर फेरीबोट लोकसेवेत ऊजू होणार नाही, हेच स्पष्ट झाले आहे.
सुमारे 97 लाख ऊपये खर्चाची ही तरंगती जेटी आरसीसी एन्कॅप्स्युलेटेड पॉलिट्रेन कोअर पॉन्टून्स पद्धतीने बांधण्यात येणार असून यशस्वी बोलीदारास तिचे डिझाईन, बांधकाम, पुरवठा, स्थापना आणि कार्यान्वयन करावे लागणार आहे. चोडण येथील विद्यमान फेरीधक्क्याजवळच ही जेटी स्थापन करण्यात येणार आहे. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 20 जुलै पर्यंत देण्यात आली आहे.