प्रतिनिधी /कुंकळ्ळी
कुंकळळीतील सोसेदाद दी ऍग्रिकोला दोस गावकारीस कुंकोलिम ई वेरोडा या संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा शाबा देसाई यांची निवड झाली आहे. या संस्थेच्या निवडणुका रविवार 8 रोजी घेण्यात आल्या व लगेच सायंकाळी मतमोजणीचे काम हाती घेण्यात आले. या निवडणुकीत तीन गट उतरले होते आणि या गटांत बरीच चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर या निवडणुकीत शाबा देसाई यांची सरशी झाली. त्यांनी अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत सागर देसाई यांच्यावर 6 मतांनी मात केली, तर निवृत्त पोलीस अधीक्षक टोनी फर्नांडिस तिसऱया स्थानी राहिले. शाबा देसाई यांना 356 मते मिळाली, तर सागर देसाई यांना 350 व टोनी फर्नांडिस यांना 262 मते मिळाली. सदस्य पदासाठी 13 उमेदवार रिंगणात होते. यातील सपनेश देसाई 386, महेश देसाई 353, गोविंद देसाई 335 व ऑस्कर मार्टिन्स हे 305 मते घेऊन विजयी झाले. कुंकळ्ळी व वेरोडा या दोन गावांतील ही पोर्तुगीजकालीन संस्था असून या संस्थेचे 1700 सदस्य आहेत. या संस्थेकडे या भागांतील बहुतांश जमिनीचे हक्क आहेत. शाबा देसाई यांचे या निवडीबद्दल सर्व थरांतून अभिनंदन केले जात आहे.