वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या महासचिवपदी दिल्ली फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष शाजी प्रभाकरन यांची नियुक्ती करण्यात आली. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनमध्ये शाजी प्रभाकरन हे कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात.
अलीकडे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनची निवडणूक झाली. भारताचे माजी फुटबॉलपटू तसेच पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते कल्याण चौबे यांची अध्यक्षपदी निवड झाली. फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार या संघटनेच्या उपसरचिटणीसपदी सुनांदो धर यांची एकमताने निवड करण्यात आली. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनमध्ये एस. धर हे आयलीग फुटबॉल स्पर्धेचे सीईओ म्हणून दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्याकडे या फेडरेशनचे सरचिटणीसपद काही कालावधीसाठी सोपविण्यात आले होते.
कुशल दास यांनी हे सरचिटणीसपद सोडल्यानंतर या पदाचा कार्यभार धर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. अलीकडेच कल्याण चौबे यांच्या अध्यक्षतेखाली फेडरेशनच्या कार्यकारी समितीची पहिली बैठक झाली. या बैठकीमध्ये शाजी प्रभाकरन यांच्या नावाला सरचिटणीसपदी अनुमोदन देण्यात आले. त्यानंतर फेडरेशनच्या सर्व सदस्यांनी एकमताने शाजी प्रभाकरन यांची महासचिवपदी निवड केली. 2017 साली शाजी प्रभाकरन दिल्ली फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष होते. तसेच त्यांच्याकडे फिफाच्या दक्षिण-मध्य आशिया विकास अधिकारीपद सोपविण्यात आले होते. एन. ए. हॅरिस यांची फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली असून अजय किपा खजिनदारपदी निवडून आले आहेत.
फेडरेशनच्या या बैठकीला बायचंग भुतिया वगळता अन्य सदस्य तसेच माजी फुटबॉलपटू उपस्थित होते. फेडरेशनच्या नव्या तांत्रिक कमिटीच्या चेअरमनपदी आय. एम. विजयन यांची नियुक्ती करण्यात आली. या तांत्रिक समितीमध्ये इ. लिंगडोह, क्लायमेक्स लॉरेन्स, हरजिंदर सिंग, अरुण मल्होत्रा आणि पिंकी बोमपाल यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार शब्बीर अलीची फेडरेशनच्या सल्लागार समिती चेअरमनपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.