कृष्णात चौगले, कोल्हापूर
Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा स्वभाव म्हणजे अथांग सागराप्रमाणे. ते कधी काय बोलतील आणि काय करतील ? याचा आजतागयात थांगपत्ता लागला नसल्याचे राजकीय तज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. पवार जे बोलतात, त्यामागे अनेक गर्भित अर्थ दडलेले असतात. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दसरा चौकातील मैदानावर त्यांची जाहीर सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर पवार यांची कोल्हापूरात होणारी राज्यातील तिसरी सभा आहे. त्यामुळे या सभेमध्ये ते कोणावर निशाणा साधणार ? आणि शरद पवार गट म्हणून कार्यरत असलेल्या राष्ट्रवादीच्या नवीन शिलेदारांना कोणता संदेश देतात याकडे जिह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
गत विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे महामेरू शरद पवार यांनी तीन पक्षांना एकत्र गुंफून राज्यात सत्ता स्थापन केली. परिणामी 2014 मधील निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या राष्ट्रवादीला 2019 मध्ये नवसंजिवनी मिळाली. पण अवघ्या अडीच वर्षातच महाविकास आघाडीला पायउतार करून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी विरोधी बाकावर गेली. या कालावधीत शिवसेनेमध्ये झालेल्या बंडामुळे राज्यातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये न्यायालयील लढाईबरोबरच आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. या नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना त्यांच्यामध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट सहभागी झाला. मूळच्या राष्ट्रवादीमधील एक मोठा गट अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शरद पवार यांच्यासोबत मोजकेच नेते आणि कार्यकर्ते शिल्लक राहिले आहेत. यामध्ये पूर्वी राष्ट्रवादीसोबत असलेले पण गेल्या काही वर्षात राष्ट्रवादीपासून दुरावलेले कार्यकर्ते आणि काही नवीन फळीतील कार्यकर्ते शरद पवार गटात सक्रीय झाले आहेत. पण ज्या पद्धतीने शिवसेनेतील फुटीनंतर एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप झाले तसे आरोप राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर फारसे झालेले दिसत नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत राष्ट्रवादीमध्ये दोन पायवाटा निर्माण झाल्या असल्या तरी पुढे जाऊन या दोन्ही वाटा एकच राजकीय महामार्गाला मिळणार काय ? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
जिल्ह्यातील सामाजिक घडामोडींवर होणार भाष्य
शरद पवार यांचे कोल्हापूरशी जुने नाते आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीची पहिली सभा त्यांनी कोल्हापूरातच घेतली आहे. कोल्हापूर आणि पवार यांचे करवीर नगरीशी असलेले जुने ऋणानुबंध सर्वश्रुत आहे. शुक्रवारी होणारी सभा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्यामुळे या सभेमध्ये पवार यांच्याकडून राजकीय टोलेबाजीबरोबरच जिह्यातील सामाजिक घडामोडींवर एक वैचारिक भाष्य होण्याची शक्यता आहे. आक्षेपार्ह पोस्टवरून जून महिन्यामध्ये झालेली दंगल आणि त्यानंतरच्या जिह्यातील राजकीय घडामोडी आदी बाबींचा उहापोह तसेच पुरोगामीत्वाला उजाळा देणारे त्यांचे मनोगत असेल असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे.
दोन्ही सभांमध्ये पंतप्रधान मोदींवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर शरद पवार यांच्या राज्यात दोन सभा झाल्या. या दोन्ही सभांमध्ये त्यांनी अजित पवार गटासोबत गेलेल्या नेत्यांचा समाचार घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे कोल्हापूरातील सभेमध्ये जिह्यातील राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना टार्गेट केले जाणार की या मुद्याला बगल दिली जाणार हे शुक्रवारी समजणार आहे.
राष्ट्रवादीच्या सभेवर महाविकास आघाडीचा राहणार प्रभाव
मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिह्यातील राष्ट्रवादीतील प्रमुख नेतेमंडळी अजित पवार गटासोबत गेले. परिणामी सध्या शरद पवार गटाकडे तळागाळापर्यंत पोहोचलेल्या नेत्यांची उणीव भासत आहे. त्यामुळे पवार यांची सभा यशस्वी करण्यासाठी खुद्द आमदार रोहित पवार यांनी जिह्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जात आहेत. सभा भरगच्च होण्यासाठी काँग्रेसबरोबरच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही सभा राष्ट्रवादीपुरती मर्यादित राहणार नसून त्याला महाविकास आघाडीच्या सभेचे स्वरूप येणार आहे.