वार्ताहर, सरूड
वारणा कापशी (तालुका शाहूवाडी )येथे जनावरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत शेतकरी कुटुंबाचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सर्जेराव गंगाराम पाटील व कृष्णदेव छबु पाटील यांच्या जनावरांच्या शेडला आग लागली. जनावरांच्या गोठ्यामध्ये सुमारे 12 लहानमोठी जनावरे होती.परंतु, प्रसंगावधान राखून लोकांनी जनावरे वेळीच बाहेर काढली. परंतु, जनावरांच्या गोठ्यामध्ये असणारी वैरण आणि गृहोपयोगी साहित्य व लाकडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
जनावरांच्या शेडचे मालक व मदतीसाठी आलेल्या ग्रामस्थांनी प्रयत्न केल्यामुळे जीवित हानी मात्र टळली.जनावरांच्या शेडला लागलेल्या आगीमध्ये सर्जेराव पाटील व कृष्णदेव पाटील यांची सुमारे तीन लाख रुपयांची आर्थिक हानी झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली.आगीचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.ऐन पावसाळ्यामध्ये जनावरांच्या शेडला लागलेल्या आगीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा व बांधण्याचा यक्षप्रश्न संबंधित कुटुंबापुढे निर्माण झाला आहे