केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाच्या सुचनेनुसार कृषी विभागाची कारवाई
कृष्णात चौगले कोल्हापूर
राज्यातील अप्रमाणित खतांची विक्री करणाऱ्या कंपन्या व सहकारी संस्थांची गंभीर दखल घेत सेंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाने आठ राज्यात धाडी टाकल्या. यामध्ये कोल्हापूर जिह्यातील शेतकरी सहकारी संघातील मिश्र खतांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये खतांचे नमुने अप्रमाणित आढळले आहेत. त्यामुळे मिश्र खतांच्या उत्पादनामध्ये नावलौकिक असलेल्या शेतकरी संघाची कार्यप्रमाणालीवर खते मंत्रालयाने ताशेरे ओढले आहेत.
खते मंत्रालयाच्या निर्देशानुसार जिल्हा कृषी विभागातील खत निरीक्षकांनी शेतकरी सहकारी संघाच्या 3 उत्पादन स्थळावरील खतांचे नमुने तपासणीसाठी घेतले. हे नमुने केंद्रीय कृषी विभागाच्या फरीदाबाद (हरियाणा) येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले. यामध्ये खतांचे तिन्ही नमुने अप्रमाणित आढळले आहेत. त्यामुळे खत निरीक्षकांनी संघाला कारणे दाखवा नोटीस लागू केली असून अद्याप कारवाईसाठी शासनाकडून कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत.
शेतकरी सहकारी संघाकडून सरळ खतांच्या विक्री बरोबरच मिश्र खतांची निर्मिती करून त्याची शेतकऱ्यांना विक्री केली जाते. यामध्ये विशेषतः 18:18:10 या मिश्रखतांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात केली जाते. खरीप आणि रब्बी पिकांसाठी या मिश्रखताला जिह्यातून मोठी मागणी असते. आजतागायत शेतकरी संघाच्या मिश्र खतावर शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे. पण कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या नमुना तपासणीत मिश्र खतांमध्ये मुलदव्यांचे प्रमाण कमी आढळले. तसेच संघाकडून विक्री केलेल्या सरळ खतांची नोंद पॉस मशिनमध्ये झाली नसल्यामुळे मशिनवर सरळ खतांचा शिल्लक साठा जास्त दिसला.
खतांचे नमुने पुनर्तपासणीसाठी पाठविणार
शेतकरी संघाच्या तीन उत्पादन स्थळावरील मिश्र खतांचे नमुने प्रथमदर्शनी किंचितसे अप्रमाणित आढळले आहेत. अप्रमाणित आढळलेल्या खतांचा 100 टन इतका साठा आहे. त्यामुळे सदर खतांचे नमुने तपासणीसाठी पुन्हा फरीदाबाद येथे पाठवले जाणार आहेत. ते नमुने देखील जर अप्रमाणित आढळले तर मिश्र खतांचा संबंधित साठा पुन्हा प्रमाणित केला जाणार आहे. 18:18:10 या मिश्र खतामध्ये किंचितसा फरक जाणवला असला तरी संघाची सर्व खते प्रमाणित आणि गुणवत्तापूर्ण आहेत. त्यामुळे शेतकऱयांनी संघाच्या खतांबाबत मनामध्ये कोणताही संशय बाळगू नये.
अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक (सहकार) तथा प्रशासक शेतकरी संहकारी संघ