सोशल मीडियाच्या वापरामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम
आयर्लंडमधील ग्रेस्टोन या शहरातील प्राथमिक शाळांमधील मुलांना आता स्मार्टफोन वापरता येणार नाहीत. स्मार्टफोनवर बंदी घालण्यासाठी 8 प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे आईवडिल एकजूट झाले आहेत. ही बंदी मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे त्यांच्या आईवडिलांचे म्हणणे आहे.
नियम लागू करण्यामागे मुलांच्या मानसिक आरोग्याची देखभाल करण्याचाही उद्देश आहे. सोशल मीडियाच्या वापरामुळे मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. येथील मुलांना आता माध्यमिक शाळेत पोहोचल्यावरच स्मार्टफोन वापरण्याची अनुमती दिली जाणार आहे.
शाळा, घर तसेच सर्वठिकाणी लहान मुलांच्या स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घातली जावी अशी मागणी पालक संघटनेने केली आहे. जर प्रत्येकाने या नियमाचे पालन केल्यास आम्हाला आमच्या मुलांना स्मार्टफोन देण्यास नकार देणे सोपे ठरणार आहे. मुलांची निरागसता जितकी अधिक टिकवून ठेवू तितकेच त्यांच्यासाठी चांगले ठरणार असे उद्गार एका छोट्या मुलाची आई असलेल्या लॉरा बॉर्न यांनी काढले आहेत. स्मार्टफोनमुळे मुलांचा आता प्रौढ सामग्रीशी संपर्क येत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.
बालपण छोटे होतेय
बदललेल्या स्थितीत आता बालपण अधिकच छोटे होत चालले आहे. पूर्वी 9 वर्षाची मुले स्मार्टफोन मागत होती, आता त्याहून कमी वयाची मुले स्मार्टफोनची मागणी करत आहेत. टाउन-वाइड पॉलिसी कोड पालक शाळेच्या नियमाच्या स्वरुपात स्वत:च्या मुलांसमोर मांडू शकतात. हा कोड स्वैच्छिक असल्याची माहिती सेंट पॅट्रिक स्कूलचे मुख्याध्यापक राहेल हार्पर यांनी दिली आहे.
अनेक समस्यांचे कारण
तज्ञांनुसार मोबाइलचा अधिक वापर मुलांच्या लाइफ स्टाइलमध्ये बदल घडवून आणत आहे, यामुळे मुलांमध्ये स्थुलत्व, भूक मंदावणे, चिडचिडेपणा यासारख्या समस्या दिसून येत ओत. अधिक काळ व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये राहिल्याने मुलांना खेळ, शारीरिक हालचाली, लोकांशी संवाद साधणे आणि आयुष्यात उपयोगी पडणारी कौशल्ये शिकण्यास अधिक वेळ देता येत नसल्याचे चित्र आहे.
मानसिक आरोग्य प्रभावित
कमी वयात मुलांच्या हाती स्मार्टफोन दिल्याने त्यांचा मानसिक विकास प्रभावित होत असल्याचे अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे. मार्च 2022 मध्ये भारतातील इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने संसदेत आकडेवारी मांडली होती. यानुसार भारतातील 24 टक्के मुले झोपण्यापूर्वी मोबाइल हाताळत असतात आणि 37 टक्के मुले एकाग्रतेच्या अभावाला तोंड देत आहेत.