ऑनलाईन टीम / तरुण भारत :
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली असून, आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थित नाना काटे (Nana Kate) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्यानंतर मेहनत घेतली तर चिंचवड विधानसभा अवघड नाही, असा विजयाचा आशावाद अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला.
चिंचवड विधानसभेसाठी आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. उमेदवारी मिळवण्यावरुन इच्छुकांमध्ये काल संध्याकाळपर्यंत चढाओढ सुरू होती. मात्र, उमेदवार निश्चित झाला नव्हता. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार आयात होतो की, काय अशी भीती इच्छुकांना होती. दरम्यान, आज सकाळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मविआने नाना काटे यांचे नाव निश्चित केले. त्यानंतर काटेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर अजित पवार यांनी विजयाचा आशावाद व्यक्त केला.
अधिक वाचा : थोरातांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये हालचाली; प्रभारी एच. के. पाटील मुंबईकडे रवाना
दरम्यान, मविआने उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही लढत तिरंगी होऊन त्याचा भाजपला फायदा होणार असल्याचे सांगण्यात येते. याबाबत अजित पवारांना मीडियाने विचारताच त्यांनी तुम्ही आता काय ज्योतिषी आहात का? असा उलट सवाल केला. त्याचवेळी तिरंगी लढतीत मते ट्रान्सफर व्हावी लागतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.