पोहता न आल्याने गमवावा लागला जीव
अक्कलकोट / प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील बादोले ( बु ) येथे बैल चारत असताना पाय घसरून एका १८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुरेश सिद्धप्पा चिनगुंडे वय १८ असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना दि ३१ च्या पहाटे उघडकीस आली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मंगळवार दि ३० रोजी दुपारच्या सुमारास मयत सुरेश याने आपल्या बैलांना चरण्यासाठी विहीरीजवळ सोडले होते. यावेळी अचानक सुरेशचा पाय घसरला आणि विहीरीकडे तोल गेला आणि पोहायला न येणाऱ्या सुरेशचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. यावेळी आसपास कोणीही नसल्याने ही गोष्ट कोणास लक्षात आली नाही. पण विहरित पडलेले टोपी व चप्पल यामुळे सुरेश विहरित पडला असावा असा अंदाज बांधत गावकऱ्यांनी जवळपास पाच विद्युत मोटारी लावून भरलेल्या विहिरीतील पाणी उपसा केले. विहिरीच्या पाण्यात डिजिटल कॅमेरा सोडून मयत सुरेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला तरीही सुरेश सापडला नाही. दुपारी दोन वाजल्यापासून ते पहाटे साडे पाच वाजेपर्यंत असे १६ तास अनेक शक्कल लढवून सुरेशचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता. पावसाळ्याचे दिवसात विहिरी तुडुंब भरलेल्या असल्याने मयत सुरेशचा शोध घेणे अवघड होते. गावकरी १६ तासापासून प्रयत्न करत होते. पण शेवटी लोखंडी गळ तयार करून विहिरीच्या तळाशी फिरवून प्रयत्न करत असताना लोखंडी गळाला मयत सुरेशचे प्रेत वर आले. मयत सुरेश हा बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. पोहता न आल्याने सुरेश जीवाला मुकला. या घटनेची खबर वडील सिद्धप्पा चिनगुंडे यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार विपीन सुरवसे हे करीत आहेत.