पुणे / प्रतिनिधी :
शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे नऱ्हे आंबेगाव येथे उभारलेली शिवसृष्टी पाहण्यासाठी येणारे शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत तीन मे ते सहा जून, म्हणजेच शिवसाम्राज्य दिनापर्यंत असेल, अशी माहिती ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम यांनी येथे दिली.
फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी खुल्या झालेल्या शिवसृष्टीला नागरिक मोठय़ा प्रमाणावर भेट देत आहेत. यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त पुढील वर्षभर प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पराक्रम शालेय विद्यार्थ्यांना आपल्या पालकांसोबत अनुभवता यावा, या उद्देशाने शाळांच्या सुट्टय़ांमध्ये शिवसृष्टीची सफर करताना त्यांनाही विशेष सवलत देण्यात येणार आहे.
या अंतर्गत सहा जूनपर्यंत शिवसृष्टी पाहायला येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांकडून 120 रुपयांऐवजी 80 रुपये आणि पालकांकडून 350 रुपयांऐवजी 250 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याबरोबरच एका वेळी 10 जणांच्या समूहाने नोंदणी केल्यास त्यांना प्रत्येकी 200 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
जून 2024 पर्यंत दुसऱ्या चरणाचे लोकार्पण
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत 19 फेब्रुवारी रोजी शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे, अर्थात ‘सरकारवाडा’चे लोकार्पण झाले. आता दुसऱ्या चरणाचे काम सुरू आहे. पुढील वषी सहा जून 2024 रोजी दुसऱ्या चरणाचे लोकार्पण होणार आहे, असे जगदीश कदम यांनी सांगितले.
प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन
शिवसाम्राज्य दिनाच्या 350 व्या वर्षाचे औचित्य साधून प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.