ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे तिन्ही महिन्याचे पगार आता दिवाळीपूर्वी दिले जाणार अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली.
परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, आज माझी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यांमध्ये आज बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारने परिवहन मंडळाला एक हजार कोटींचे पॅकेज मंजूर केले आहे. त्यामुळे आता परिवहन महामंडळाला आता एस कर्मचाऱ्यांचे पगार देणे शक्य होणार असल्याचे परब यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होता. महामंडळाची आर्थिक परिस्थिती पाहता पैशांची जमवाजमाव करणे कठीण होते. गेल्या दोन-चार दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरु होते. एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्याचे वेतन थकित होते. त्यापैकी दिवाळीसाठी एका महिन्याचा पगार काल दिला. आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक झाली.
कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न नेहमी तयार होतो, म्हणून मी आज अजित पवारांकडे सहा महिन्यांसाठी पॅकेज द्या अशी मागणी केली. त्यानंतर एसटीला एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता तिन्ही महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देणार आहोत. येत्या दोन दिवसात कर्मचाऱ्यांना पगार दिला जाईल असे ही त्यांनी यावेळी सांगितले.