सुदैवाने जीवित हानी टळली
सावंतवाडी/प्रतिनिधी:-
सावंतवाडीहून शिरोड्याकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची रस्त्यालगतच्या झाडाला धडक बसून अपघात घडल्याची घटना मंगळवार दि. 18 ऑक्टोबर रोजी रात्रौ 9 च्या दरम्यान घडली. याबाबतची माहिती अशी की, सावंतवाडी- शिरोडा एसटी बसचे चालक एस. एल. राणे आणि वाहक पी. पी मेस्त्री हे आपल्या ताब्यातील सावंतवाडी आगाराची एसटी बस सावंतवाडीहून शिरोडा येथे घेऊन जात होते.
आजगांव मराठी शाळेनजीक प्रसाद प्रभूझांट्ये यांच्या दुकानाकडे एसटी बस आल्यावर चालक राणे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या विरूद्ध दिशेने असलेल्या, दुकानासमोरील आंब्याच्या झाडाला धडकली. या अपघातात बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत जीवीत हानी झाली नाही.
मंगळवार रात्रौ 9 च्या दरम्यान सदर घटना घडली असून भरधाव वेगाने जात असलेल्या एसटी चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेत झांट्ये यांचे सिमेंट कौले आणि गोडावूनचे छप्पर असे मिळून सुमारे 25 ते 30 हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.