फ्रान्सचे इराणला आवाहन : रशियाला सैन्य ड्रोन पुरविण्याचा आरोप
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इराणला रशियाला मदत करणे त्वरित थांबविण्यास सांगितले आहे. मॅक्रॉन यांनी इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. युक्रेन युद्धात रशियाला ड्रोन अन् शस्त्रास्त्रs पुरविणे इराणने त्वरित थांबवावे. अशाप्रकारच्या मदतीमुळे सुरक्षा आणि मानवी दृष्टीकोनातून गंभीर परिणाम होतील असे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.
रशिया इराणच्या मदतीने सैन्य ड्रोन निर्मितीचा प्रकल्प निर्माण करत आहे. इराण या ड्रोन प्रकल्पासाठी उपकरणे आणि अन्य सामग्री कॅस्पियन समुद्रामार्गे रशियापर्यंत पोहोचवित आहे. रशियाने आतापर्यंत इराणकडून शेकडो ड्रोन्स खरेदी केली असून त्यांचा वापर युक्रेन विरोधात केला जात आहे. रशियाची राजधानी मॉस्कोपासून सुमारे 965 किलोमीटर अंतरावरील अलबुगा स्पेशल इकोनॉमिक झोनमध्ये हा ड्रोन निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाचे एक उपग्रहीय छायाचित्र अमेरिकेकडून जारी करण्यात आले आहे.
तत्पूर्वी रशियासोबत सुखोई-35 लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार झाल्याची घोषणा इराणने मार्च महिन्यात केली होती. रशियाकडून हल्ल्यासाठी इराणच्या कामिकाजे ड्रोनचा वापर होत असल्याचा आरोप युक्रेनने अनेकदा केला आहे. युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये इराणी ड्रोनचे अवशेषही हस्तगत झाले आहेत. तर रशियाने हे आरोप फेटाळले आहेत. इराणने रशियाला ड्रोन पुरविल्याचे मान्य केले होते, परंतु हा पुरवठा युद्ध सुरू होण्यापूर्वी करण्यात आल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे.
युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाने यापूर्वी इराणच्या कामिकाजे ड्रोनद्वारे हल्ला केला होता. या ड्रोनला इराणचे सर्वात धोकादायक शस्त्र मानले जाते. या इराणी ड्रोनला सुसाइड ड्रोन देखील म्हटले जाते. इराणी ड्रोनद्वारे रशिया आता युक्रेनियन रडार सिस्टीमला लक्ष्य करत आहे. क्रीमियामध्ये इराणचे सैनिक रशियाच्या सैनिकांना या ड्रोनच्या हाताळणीचे प्रशिक्षण देत आहेत.