बेळगाव : बेंगळूर येथे 42 व्या राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत बेळगावचे मास्टर्स क्रीडापटूंनी 10 सुवर्ण, 5 रौप्य व 2 कांस्यपदकांसह एकूण 17 पदकांची कमाई केली आहे. बेंगळूर येथे झालेल्या या स्पर्धेत बेळगावचे वयस्कर धावपटू उचगावचे सुरेश देवरमनी यांनी 75 वर्षावरील गटात 1500 मी. धावणे, 800 मी. धावणे, 3 किलोमीटर चालणे व 4×400 मी. रिले स्पर्धेत एकूण 4 सुवर्णपदके तर 5 किलोमीटर चालणे व 4×100 रिलेमध्ये 2 रौप्यपदके पटकाविली. वसंत जाधव यांनी 85 वरील गटात हातोडा फेक, थाळीफेक व भालाफेक या तिन्ही प्रकारात 3 सुवर्णपदक तर गोळाफेकमध्ये रौप्यपदक पटकाविले. बाळकृष्ण बेळगुंदकर यांनी 65 वरील गटात भालाफेकमध्ये सुवर्ण, थाळीफेक व हातोडा फेक मध्ये चमकदार कामगिरी केली. मारुती कणबरकर सुळगा यांनी 75 वर्षावरील गटात भालाफेक, 4×400 मी. रिले या दोन्ही प्रकारात 2 सुवर्णपदके तर 4×100 मी. रिलेमध्ये रौप्यपदक पटकाविले. सुरेश सांगावकर हिंडलगा यांनी 75 वर्षावरील गटात 1500 मी. धावणे, 5 किलोमीटर धावणे या दोन्ही प्रकारात 2 कांस्यपदके पटकाविली. कागवाडकर यांनी 5 किलोमीटर धावणे, थाळीफेक स्पर्धेत सहभाग घेऊन चमकदार कामगिरी केली.
धोंडीराम शिंदेंची चटका लावणारी एक्झिट
धोंडीराम शिंदे, हिंडलगा यांनी या स्पर्धेत 4×400 रिलेमध्ये सुवर्ण, 4×100 रिलेमध्ये रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेनंतर बेळगाव येथे आयोजित केलेल्या अहिंसा रन मिनी मॅरेथॉन स्पर्धेत 5 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन धावत असताना अचानक कोसळून त्यांचे निधन झाले. बेंगळूर येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी चमक दाखविली होती. तीच स्पर्धा त्यांची शेवटची ठरली आहे. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असल्याने सर्व वयस्कर क्रीडापटूंना आपल्यासमवेत स्पर्धेला घेऊन जात. त्यामुळे वयस्कर क्रीडापटूंना त्यांच्या निधनाने धक्का बसला आहे. या सर्व क्रीडापटूंनी धोंडीराम शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली.