कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाली. निकाल लागला आणि तेथे काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली. भाजपची आमदार संख्या घटली. पण मताची टक्केवारी कायम राहिली. काँग्रेसने कुमारस्वामींचा पक्ष व किरकोळ संघटना यांची मते स्वत:कडे ओढली आणि भाजपला चारीमुंड्या चित केले. या निकालानंतर भाजपा विरोधकात आनंदाची लाट आली. मोदी-शहाचा पराभव होऊ शकतो हे वास्तव पुढे आल्याने अनेकांनी एकमेकांना पेढे भरवले. गाठीभेटी घेतल्या व लोकसभा निवडणुकीत अठरा पक्ष एकत्र येऊन भाजपला पराभूत कऊया असे संकल्प पेले. महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांना वेगवेगळी स्वप्ने पडली. नव्या संसदेच्या इमारतीच्या उद्घाटनावर या अठरा पक्षांनी बहिष्कार टाकला. नितीश कुमार, शरद पवार, संजय राऊत, अरविंद केजरीवाल रोज नव-नवे आखाडे बांधत आहेत आणि संधी मिळाली तर नितीशकुमार, शरद पवार पंतप्रधान होतील असा असा यांचा कयास आहे. यश कुणाचे आणि बाशिंग कोण बांधतयं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुळात कर्नाटकचा कौल आणि देशाचा कौल यात खूप अंतर आहे आणि कर्नाटकात काँग्रेसने अठरा पक्षाची महाआघाडी केली असती तर आज जे चित्र दिसते आहे ते दिसले असते का? हा प्रश्न आहे. कालच सी व्होटरने केलेल्या पाहणीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये मतदारांची पंतप्रधान म्हणून पहिली पसंत नरेंद्र मोदी आहेत. दुसरा क्रमांक राहूल गांधींचा आहे. तिसरा नंबर योगी आदित्यनाथ यांचा आहे. नितीशकुमार वगैरे सहाव्या, सातव्या क्रमांकावर आहेत. मोदींची लोकप्रियता थोडी घटली असली व राहूल गांधींची वाढली असली तरी दोघात जवळजवळ 20 टक्क्याचे अंतर आहे. पण निवडून येणाऱ्या जागात तफावत आहे. स्पष्ट बहुमत नसेल आणि युती-आघाडीत वांदे झाले की काय होते हे महाराष्ट्र व महाराष्ट्रातील मतदार अनुभवत आहेत. ओघानेच कुणी किती पेढे वाटले आणि छाती फुगवली तरी मतदारांना सर्वांचे सर्व रंग, अंतरंग ज्ञात आहेत आणि भारतीय लोकशाही प्रगल्भ आहे. मतदार शहाणे आहेत. त्यांना स्थिर सरकार, खिचडी सरकार याचा पूर्वानुभव आहे. जे अठरा पक्ष एकत्र येणार असे म्हणत आहेत त्यामध्ये एक समानता आहे. ते सर्व एका नेत्यांचे पक्ष आहेत. काँग्रेस वगळता सारे प्रादेशिक आहेत. आपणास व आपल्या मुलाबाळांना सत्ता इतकाच त्यांचा खरा कार्यक्रम आहे. त्यामुळे ही आघाडी शेवटपर्यंत टिकवण्याची शक्यता अल्पच आहे आणि कर्नाटकात काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाल्याने काँग्रेसच भाजपा विरोधी आघाडीचा मोठा भाऊ राहणार व राहूल गांधीच नेते राहणार हे उघड आहे. अन्य पक्ष दावे-प्रतिदावे करत असले तरी काँग्रेस शांत आहे. काँग्रेसने कर्नाटक पॅटर्न राबवला तर देशात वेगळे चित्र दिसेल हे उघड आहे. नरेंद्र मोदी यांनी सत्तेची नऊ वर्षे पार केली आहेत. भारत आज उभरता देश म्हणून जगमान्य झाला आहे. जगभर भारताचा डंका वाजतो आहे. भारतीय अर्थव्यवस्था सुधारते आहे. जगात आणि देशात वेगवेगळी स्थिती असली तरी महाराष्ट्रात वेगळी स्थिती आहे. कागदावरच्या आघाड्या व युती व प्रत्यक्षातील जुळण्या या वेगळ्या असतात. बारामतीकर त्यात तरबेज आहेत. जयंत पाटीलही करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर आहेत. लोकसभा, महापालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा अशा निवडणुका समोर आहेत. यासर्व निवडणुका एकत्रच घेण्याची खेळी भाजपा खेळू शकते त्यामुळे विरोधी आघाडीत गोंधळ, मतभेद व फुटाफुटी अपेक्षित आहे. पण सध्या लोकसभेसाठी जागा वाटपावऊन ताण-तणाव आहेत. भाजपा समोर मविआचे आव्हान असले तरी मविआत मोठा भाऊ कोण यावऊन तणाव आहे. उद्धव ठाकरे यांना लोकसभेच्या वीस जागा हव्या आहेत. त्यांच्या पोटात प्रकाश आंबेडकर यांची बहुजन विकास आघाडी आहे. ठाकरे यांची पूर्वीची ताकद राहिली नाही. अनेक आमदार व खासदार त्यांना सोडून गेले. महाआघाडीत ठाकरे सेना सर्वात लहान भाऊ आहे असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार आमचा पक्ष मोठा भाऊ आहे असा दावा करत आहेत. ओघानेच जागा वाटपावऊन महाआघाडीत तणाव राहिल हे स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडील उर्वरित आमदार, खासदारही शिंदे सेनेत जाण्याच्या तयारीत आहेत अशी वार्ता आहे. भाजपा-शिंदे सेनेत जागा वाटपावऊन बोलणी नसली तरी एकनाथ शिंदेंना साथ देणाऱ्या सर्व आमदार-खासदारांना भाजपा जागा सोडणार हे स्पष्ट आहे. ओघानेच शिंदे सेनेला युतीत लोकसभेच्या वीस जागा सुटतील असे दिसते आहे. भाजपला 300 जागा मिळवून पुन्हा लोकसभा आपल्या पक्षाकडे राखायची आहे आणि त्यासाठी शहा-मोदी काहीही खेळी कऊ शकतात. एकनाथ शिंदे यांना सर्व्हेमध्ये मतदाराचे पुरेसे समर्थन नाही पण काम करणारा, सतत उपलब्ध असणारा मुख्यमंत्री अशी त्यांनी ओळख वाढवली आहे. संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले त्यानंतर पंतप्रधानांनी भाजप शासित मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली तेव्हा एकनाथ शिंदे यांना त्यांनी विकासकामात आमदाराबरोबरच खासदाराची काळजी घ्या, असे सांगितले आणि एन.डी.ए आपला रौप्यमहोत्सव साजरा करणार असे सांगितले. यातून शिंदे व त्यांच्या शिवसेनेला नवा विश्वास प्राप्त झाला आहे. गजानन कीर्तीकर यांनी जी नाराजी व्यक्त केली होती त्यांची ही दखल मानावी लागेल. भाजपला छोट्या-छोट्या पक्षाची मित्राची गरज व महत्व लक्षात येते आहे. यातूनही अनेक अर्थ निघू शकतात. तूर्त लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष व आघाड्या एकमेकांचा अंदाज घेताना दिसत आहेत. घोडा मैदान लांब आहे. एकमात्र आहे कर्नाटक निवडणुकीनंतर हिंदू-मुस्लीम ताणतणाव वाढताना दिसतो आहे. सोशल मिडियावर त्याचे दर्शन होते आहे. नजिकच्या काळात हा ताण काय आकार घेतो हे बघावे लागेल पण धार्मिक व्होट बँका पुन्हा डौलदार होताना दिसत आहेत. मोदींनी नऊ वर्षात अनेक चांगली कामे केली असली तरी महागाई-बेरोजगारी यावर त्यांनी काबू ठेवलेला नाही. नोटाबंदी निर्णयही टिकेचा झाला होता. निवडणुकीला अजून अवकाश आहे. तोपर्यत मतदारांचे कल व सर्व्हेचे अंदाज बदलतील पण देशात ‘हिंदू व्होट बँक’ आकारण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. सी व्होटरच्या सर्व्हेनंतर राजकीय पक्षांनी नव्याने हालचाली सुऊ केल्या आहेत.
Previous Articleगोवा-मुंबई ‘वंदे भारत’शनिवारपासून
Next Article वाहतूक नियम मोडणाऱ्यांची खैर नाही!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment