हृदयविकाराच्या धक्क्यानंतर झाले उपचार
अलिकडेच हृदयविकाराचा धक्का बसला होता, त्यानंतर अँजियोप्लास्टी करावी लागल्याचा खुलासा अभिनेत्री सुष्मिता सेनने केला आहे. आता माझी प्रकृती बरी आहे. स्वतःचे हृदय नेहमी आनंदी आणि मजबूत ठेवा, कारण जेव्हा तुम्हाला याची सर्वाधिक गरज असेल, तेव्हा ते तुमच्यासोबत उभे असेल असे सुष्मिताने म्हटले आहे.
माझे हृदय अत्यंत मजबूत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. वेळीच मदत करणाऱया तसेच आवश्यक पावले उचलणाऱया लोकांचे मनापासून आभार. ही पोस्ट माझ्या चाहत्यांसाठी आहे. आता मी पूर्णपणे बरी असल्याचे आणि पुन्हा नवे जीवन जगण्यासाठी तयार असल्याची खूशखबर चाहत्यांना देऊ इच्छिते असे सुष्मिताने नमूद केले आहे.
सुष्मिता सेनचे वय 47 वर्षे असून ती बॉलिवूडची सर्वात तंदुरुस्त अभिनेत्री मानली जाते. सोशल मीडियावर ती फिटनेसचे व्हिडिओ शेअर करत असते. 1994 मध्ये सुष्मिताने मिस युनिव्हर्सचा मान मिळविला होता, त्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये एंट्री मिळाली होती. दस्तक या महेश भट्ट यांच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.
सुष्मिताचा यापूर्वीचा अखेरचा चित्रपट 2010 मधील ‘दुल्हा मिल गया’ होता. त्यानंतर सुष्मिताने चित्रपटांपासून एकप्रकारे अंतरच राखले होते. तर 2020 मध्ये सुष्मिताने ‘आर्या’ या वेबसीरिजद्वारे अभिनयाच्या जगतात पुनरागमन केले होते. 2021 मध्ये या वेबसीरिजचा दुसरा सीझनही प्रदर्शित झाला होता. आता आर्या 3 चे चित्रिकरण सुरू असून लवकरच तो देखील प्रदर्शित केला जाणार आहे.