उच्च न्यायालयाकडून दिलासा ः धर्माचा विजय झाल्याची टिप्पणी
वृत्तसंस्था / हैदराबाद
कथित स्वरुपात वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी तुरुंगात कैद असलेले भाजप आमदार टी. राजा सिंह यांची सशर्त जामिनावर सुटका करण्याचा आदेश तेलंगणा उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यालयाने बुधवारी भाजपमधून निलंबित आमदाराला मोठा दिलासा दिला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने टी. राजा सिंह यांना सभा अन् पत्रकार परिषद न घेण्याच्या अटीवर तुरुंगातून मुक्तता करण्याचा आदेश दिला आहे. पोलिसांनी टी. राजा सिंह यांच्या विरोधात पीडी ऍक्ट अंतर्गत कारवाई केली होती.
मुक्ततेच्या आदेशानंतर टी. राजा सिंह यांनी ट्विट करत धर्माचा विजय झाला असून पुन्हा एकदा जनतेच्या सेवेत उपस्थित झाल्याचे उद्गार काढले आहेत. वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी ऑगस्टमध्ये टी. राजा सिंह यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. तर विशिष्ट समुदायाच्या लोकांच्या संतापावर नियंत्रण मिळविण्यासाठी टी. राजा सिंह यांना पोलिसांनी अटक केली होती.
टी. राजा सिंह हे तेलंगणाच्या गोशमहल मतदारसंघाचे आमदार आहेत. इका समुदायाच्या विरोधात त्यांनी अनेकदा कथितपणे वादग्रस्त विधाने केली आहेत. 2020 मध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्रामने त्यांच्या अकौंट्सवर बंदी घातली होती.
टी. राजा सिंह यांनी तेलगू देसम पक्षातून स्वतःच्या राजकीय कारकीर्दीस प्रारंभ केला होता. 2009-14 पर्यंत ते ग्रेटर हैदराबाद महापालिकेचे नगरसेवक हेते. 2014 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी तेदेपमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत विजय मिळविला. त्यानंतर 2018 मध्येही ते गोशमहल मतदारसंघातून विजयी झाले होते.