अनुसूचित जमात आणि वाल्मिकी नोकर संघाचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
चित्रदुर्ग येथील मुरुघा मठाच्या मठाधिशांनी जे कृत्य केले आहे ते अशोभनीय आहे, समाजाला घातक आहे. एक मठाधीश होऊन अशा प्रकारे अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला आहे. त्यामुळे त्या मठाधीशांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी अनुसूचित जमात आणि वाल्मिकी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मुरुघा मठाधीशांनी दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. त्यांच्यावर पोक्सो सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असताना देखील त्यांना अटक करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. यामुळे समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. मठाधीश असो किंवा सर्वसामान्य व्यक्ती असो, जो गुन्हा करतो त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. मात्र मठाधीश किंवा एखादी मोठी व्यक्ती असेल तर त्याला एक न्याय दिला जातो. ही बाब गंभीर आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
या मठाधीशांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी महेश शिग्गीहळ्ळी, भीमू कोरवी, राम पुजारी, शिला नायक, विजय बेरड, सचिन कोलकार, स्वप्नील कडाबळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.