एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांचे आवाहन : अग्निवीरांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ : अग्निवीर निवड होणे गौरवाची बाब
प्रतिनिधी /बेळगाव
देशात प्रथमच सुरू झालेल्या अग्निपथ योजनेतील अग्निवीर म्हणून निवड होणे ही अत्यंत गौरव व महत्त्वाची बाब आहे. अग्निवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. अग्निवीरमुळे एका सामान्य तरुणाचे देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणांचीही पर्वा न करणाऱ्या सैनिकांमध्ये परिवर्तन होणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रशिक्षण गांभीर्याने घ्या आणि देश सेवेसाठी सज्ज व्हा, असे आवाहन एअर
ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंग (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीआरसी, व्हीएसएम, एडीसी) यांनी केले.
सांबरा एअरफोर्स स्टेशन येथे अग्निपथ योजनेंतर्गत 2 हजार 850 अग्निवीर दाखल झाले आहेत. शुक्रवारपासून त्यांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला आहे. या सर्वांना उद्देशून ते बोलत होते.
ते म्हणाले, देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो, तेव्हा लष्काराची तीनही दले कोणतीच तडजोड करत नाहीत. भारतीय वायुसेना ही नेहमीच भविष्याकडे पाहते आणि अग्निवीर वायू हे सरकारने उचलेले महत्त्वाचे पाऊल आहे. अत्यंत कठीण अशा सर्व चाचण्यांमधून तुमची निवड होणे हेच विशेष आहे. तुमची क्षमता, संयम, निष्ठा, शिस्त यांची कसोटी या प्रशिक्षणात लागणार आहे.
प्रशिक्षणाचा उपयोग करून घ्या
आम्ही प्रशिक्षण देण्यासाठी सदैव तयार आहोत. फक्त तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या. विशेष म्हणजे या प्रशिक्षणामध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर अधिक भर देण्यात आला आहे. अभ्यास करुन स्वत:ला सिद्ध करा आणि देशरक्षणासाठी पुढे या, असे आवाहनही एअर ऑफीसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांनी केले.
लष्कराचा हिशोब मिनिट अन् सेकंदावर
बाहेरच्या जगात आपल्या वेळेनुसार आपण वेळापत्रक आखतो. पण लष्कर दिवसावर नव्हे सेकंद आणि मिनिटे यांच्या हिशोबावर काम करते. त्यामुळे वेळेचे महत्व ओळखून घ्या. तुमचा वेग वाढवा आणि स्वत:ला सिद्ध करा, असेही त्यांनी नमूद केले.
तत्पूर्वी इन्फंट्री वेपन ट्रेनिंग सिम्युलेटर येथे अग्निवीरांना शस्त्रास्त्र चालविण्याचे प्राथमिक प्रशिक्षण कसे दिले जाणार आहे, याची माहिती देण्यात आली. अग्निवीरांची चाचणी परीक्षा डिजिटल माध्यमातून घेण्यात येणार असून, या चाचण्यावेळी मानवी हस्तक्षेप कमी होईल यावर भर देण्यात आला आहे. सर्व अग्निवीरांना टॅब देण्यात येवून त्याद्वारे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांच्या चाचणी परीक्षेसाठी विशेष कक्ष तयार केले आहेत. दरम्यान दाखल झालेल्या अग्निवीरांपैकी काही जणांना शारीरिक कसरतीही सादर केल्या. त्यामध्ये उंचउडी, दोरीच्या सहाय्याने वर चढणे, ब्लाईंड फोल्ड रायफल्स, भिंत चढणे याची प्रात्यक्षिके दाखविली. एकूण सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ झाला आहे.