वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरातील विविध शहरांमध्ये टाटा समूह येत्या काळामध्ये शंभर छोटी आधुनिक अशी ऍपल स्टोअर्स सुरू करणार आहे. साधारण 500 ते 600 चौ. फूट क्षेत्रफळाची ही स्टोअर्स असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ऍपल यासंदर्भात टाटाच्या मालकीच्या इन्फिनिटी रिटेलसोबत चर्चा करत आहे. इन्फिनिटी रिटेल यांच्या अंतर्गत भारतामध्ये टाटाच्या क्रोमा स्टोअर्सची उभारणी करण्यात आलेली आहे.
विविध मॉलमध्ये त्याचप्रमाणे महत्त्वाच्या ठिकाणी छोटय़ा स्वरुपात ऍपलची निवडक उत्पादने सदरच्या शंभर नव्या स्टोअर्समध्ये ठेवली जाणार आहेत. प्रिमियम स्वरुपातील स्टोअर्स ही 1 हजार चौ. फुटाच्या क्षेत्रफळात उभारली जातात. तर छोटय़ा स्टोअर्समध्ये आयफोन, आयपॅड्स आणि वॉच अशी उत्पादने ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. ऍपल कंपनीचे पहिले वहिले अधिकृत स्टोअर मार्चच्या तिमाहीमध्ये मुंबईमध्ये पहिल्यांदा लाँच केले जाण्याची शक्मयता सांगितली जात आहे.
17 लाख आयफोन्सची विक्री
जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये 17 लाख आयफोन्सची विक्री भारतामध्ये झाली आहे. मागणी लक्षात घेता कंपनी भारतात उत्पादनांच्या अधिकाधिक विक्रीसाठी प्रयत्न करणार आहे.