पंचायत प्रशासकीय कारभारात सुधारणा करण्यात यश
प्रतिनिधी / वास्को
गोव्यातील पंचायत प्रशासकीय कारभारात बरीच सुधारणा करण्यात यश आलेले असून आता जनतेची कामे झटपट होऊ लागलेली आहेत. गोव्याला चांगले सरपंचही लाभलेले आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत गोव्यातील पंचायतींचा कारभार पूर्णपणे ऑनलाईन होईल अशी माहिती पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी बोगमाळो पंचायतीत घेतलेल्या पत्रकार परीषदेत दिली. यावेळी बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले, उपसरपंच लॉरेन्हा डिकुन्हा, चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, बोगमाळोचे पंच सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
पंचायतमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की पूर्वी पंचायतीच्या कारभारात संथपणा होता. फाईल्स पडून राहात होत्या. मात्र, आता सरकारने पंचायत कायद्यांमध्ये सुधारणा केलेल्या आहेत. त्यामुळे आता 15 दिवसांत कामे पूर्ण करण्यात येतात. नळ जोडणी किंवा अन्य सेवा मिळवण्यासाठी आता फारशा अडचणी राहिलेल्या नाहीत. प्रत्येक पंचायतीला पूर्णवेळी सचिव देण्यात आलेले आहेत. गोव्यातील जवळजवळ सर्व पंचायतींचे सरपंच चांगल्या पध्दतीने कार्य करीत आहेत. प्रत्येक पंचायतीत कामे तडीस लावली जात असल्याने आता उपलब्ध निधीही कमी पडू लागलेला आहे. गोव्यातील सर्व पंचायतींमध्ये या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील असे मंत्री गुदिन्हो म्हणाले. गोव्यात 25 पंचायतींसाठी नवीन पंचायत घरांची उभारणी करण्यात आलेली आहे. आणखी 14 पंचायत घरे बांधून सज्ज ठेवण्यात आलेली आहेत. तसेच नवीन पंचायत घरांसाठी 37 प्रस्ताव खात्याकडे आलेले आहेत. बहुतेक सर्व पंचायतींमध्ये कचऱ्याची विल्हेवाट योग्य पध्दतीने लावली जात आहे. त्यांनी कचरा विल्हेवाटीची क्षमता निर्माण केलेली आहे. पंचायतींचा कारभार आता सुधारलेला आहे अशी माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली.
प्रत्येक पंचायत महसुलाच्याबाबतीत स्वावलंबी असावी. स्वताचा महसुल त्यांनी स्वताच उभा करावा यावर सरकारने भर दिलेला आहे. चिकोळणा बोगमाळो पंचायतीने या दिशेने प्रयत्न करून कार्यवाही सुरू केल्याने ती गोव्यातील अशा प्रकारची पहिली पंचायत ठरलेली आहे. लोकांना विश्वासात घेऊनच पंचायतीने स्वालंबनाच्या दृष्टीने पावले उचलल्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. चिकोळणा बोगमाळो पंचायत स्थापनेच्या 27 वर्षांनंतर प्रथमच व्यवसायीक कर लागू करणार आहे. मंत्र्यांनी यावेळी या पंचायत क्षेत्रातील विविध विकास कामांची माहिती दिली. मैदानाचे चाललेले काम, पंचायत घराच्या उभारणीसाठी सुरू झालेली प्रक्रिया, नाल्यांची सफाई, नवीन ट्रान्स्फोर्मर, बोगमाळो किनाऱ्याचे सौदर्यीकरण, पंचायतीमार्फत होणारी विविध शासकीय योजनांची कार्यवाही अशा विविध कामांची माहिती त्यांनी दिली. येत्या ऑगष्टपर्यंत चिखली पंचायत क्षेत्रात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असून या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्यानांसाठी करण्यात येणार असल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले.