ऑनलाईन टीम / तरुण भारत :
चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. अश्विनी जगताप यांनी आज शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र, दुसरीकडे प्रतिस्पर्धी असलेल्या महाविकास आघाडीचा (राष्ट्रवादी काँग्रेस) उमेदवार अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. ऐनवेळी उमेदवार आयात होतो की काय अशी भीती इच्छुकांना आहे.
भाजपने चिंचवडचे तिकीट जगताप कुटुंबात दिले. मात्र, कसब्याचे तिकीट हेमंत रासने यांना देऊन माईंड गेम खेळला आहे. मविआकडून कसब्याचे तिकीट काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना देण्यात आले आहे. तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढवणार आहे. भाजपकडून अजूनही ही निवडणूक बिनविरोध करणयासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. उमेदवार बदलून तो टिळक कुटुंबात देण्याची तयारी दर्शवून भाजपने मविआला बिनविरोधचे आवाहन केले आहे. त्यामुळे मविआच्या उमेदवारांना त्याचीही चिंता आहे.
दरम्यान, आज भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू शंकर जगताप यांनीही खबरदारी म्हणून डमी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.