पुणे / प्रतिनिधी :
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 जानेवारी 2023 ला देशपातळीवरील छायाचित्रासह मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनर्परीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ येत्या 9 नोंव्हेंबरला रोजी पुणे येथे होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
देशपांडे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मतदान नोंदणी अभियानाच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे, शिवाय याठिकाणी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे मतदार जागृतीसाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोग वंचित घटकांनाही महत्व देत असल्याने दोन्ही निवडणूक आयुक्त याच ठिकाणी तृतीयपंथीय समुदायाशी संवाद साधणार आहे.
शहरी मतदार आणि युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे नमूद करून देशपांडे म्हणाले, मतदारयादीचा पुनर्परीक्षणाचा कार्यक्रम आगामी काळातील निवडणुकांच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे.
मतदारनोंदणीच्या जागृतीसाठी सायकल रॅली
मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या उपस्थितीत मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यासाठी 9 नोव्हेंबर रोजी बालेवाडी येथे सकाळी 6.30 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी होणार आहेत. या माध्यमातून पुणे शहराच्या विविध भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीसोबतच त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. या सायकल रॅलीमध्ये नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.