साडेदहा हजार क्युसेसच्या विसर्गाने बोलादवाडी नाला तुडूंब : वाढलेल्या पाणीपातळीची तपासणी : वाशिष्ठीवर फारसा परिणाम नाही
प्रतिनिधी/चिपळूण
Kolkewadi Dam Gates Open : कोळकेवाडी धरणाचे वक्र दरवाजे उघडून त्याद्वारे अवजल सोडण्याची दुसरी चाचणी गुरूवारी सकाळी घेण्यात आली. पूरनियंत्रणाचा एक भाग म्हणून सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत धरणाची वक्रद्वारे ४ फुटाने उघडून १० हजार क्युसेस पाणी बोलादवाडी नाल्यातून वाशिष्ठी नदीत सोडण्यात आल्याने एरव्ही कोरडा पडणारा नाला तुडूंब भरून वाहू लागला होता. संचारबंदी असूनही पाणी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.
यापूर्वी धरणातून १८ ऑगस्टला धरणाचे वक्र दरवाजे उघडून करण्यात आलेल्या पहिल्या चाचणीत २४०० क्युसेस पाणी बोलादवाडी नाल्यातून वाशिष्ठी नदीत सोडण्यात आले. यावेळी नाल्याची वहन क्षमता, वाशिष्ठी नदीत पाणी पातळीत होणारी वाढ तपासण्यात आली. त्यानंतर गुरूवारी कोळकेवाडी धरणाचे वक्रद्वारे सकाळी १० वाजता उघडून बोलादवाडी नाल्यातून वाशिष्ठी नदीत विसर्ग सुरू करण्यात आला. तत्पूर्वी धरणमाथा, नागावे पूल परिसरात भोंगे वाजवून पूर्वसूचना देण्यात आली. नंतर धरणाचे तिनही दरवाजे टप्प्याटप्प्याने ४ फुटापर्यंत उघडले. दोन तासांच्या या कालावधीत १० हजार ५०० क्युसेस विसर्ग बोलादवाडी नाल्यात सोडण्यात आला. या चाचणीचा मुख्यउद्देश बोलादवाडी नाला ते वाशिष्ठी संगमापर्यंत वहन कालावधी तपासणे, बोलादवाडी नाल्यामधील पाणी पातळीतील वाढ तपासणे तसेच नाल्यातील अतिक्रमणे, वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ तपासणे हा होता.