नव्या झुआरी चौपदरी पुलाचे 29 रोजी उद्घाटन : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी राहणार उपस्थित : मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, उद्घाटन तयारीला वेग
- आठ पदरी पुलाचा एकूण खर्च 2530 कोटी
- एकूण महामार्ग 13 किलो मिटर लांब
- झुआरी नदीवरील पुलाची लांबी 800 मिटर
प्रतिनिधी / वास्को
झुआरी नदीवरील पहिल्या टप्प्यातील चौपदरी पुलाचे उद्घाटन येत्या गुरूवारी 29 रोजी करण्याचे निश्चित झालेले असून केंद्रीय भुपृष्ट वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संध्याकाळी 6 वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 30 पासून सर्व वाहनांसाठी हा पुल खुला होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरूवारी या पुलाची पाहणी करताना उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, दिलीप बिल्डकॉन कंपनीचे अधिकारी व वाहतूक पोलीस अधिकारीही उपस्थित होते.
उत्तर व दक्षिण गोव्याला जोडणाऱया झुआरी नदीवरील हा दुसरा पुल वाहतुकीसाठी खुला होण्याची गोव्यातील जनतेला प्रतीक्षा आहे. हा पुल वाहतुकीस खुला झाल्यानंतर आगशी, कुठ्ठाळी ते वेर्णापर्यंत होणाऱया वाहतूक कोंडीची समस्या संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नवीन पुल लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक होते. जनतेची प्रतीक्षा येत्या 29 रोजी संपणार आहे.
उद्घाटन समारंभाची जय्यत तयारी
झुआरी नदीवरील या आठ पदरी पुलाच्या पहिल्या टप्प्यातील एका बाजुच्या चौपदरी पुलाचे काम पूर्ण झालेले असून 29 रोजी संध्याकाळी 6 वाजता या पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या पुलावरच होणार आहे. उद्घाटन समारंभाची जय्यत तयारी सरकारी पातळीवर सुरू झालेली आहे. गुरूवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी संबंधीत अधिकाऱयांसह या पुलाची पाहणी केली व काही विशिष्ठ सुचना यावेळी त्यांनी अधिकाऱयांना केल्या.
उद्घाटनाला पाच हजारांची उपस्थिती
मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांकडे उद्घाटनाच्या कार्यक्रमाविषयी व व्यवस्थेविषयी चर्चा केली. उद्घाटन समारंभाला जवळपास पाच हजार लोक उपस्थित राहतील या दृष्टीने प्रयत्न चाललेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुलाच्या पाहणीवेळी गुरूवारी सकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम 26 रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, कंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित कार्यक्रमांमुळे उद्घाटनाचा कार्यक्रम 26 ऐवजी 29 रोजी संध्याकाळी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केले.
या पुलाच्या पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सावंत सांगितले की गोव्यात या पुलासह अनेक विकास प्रकल्प केंद्रीयमंत्री गडकरींच्या सहकार्यामुळेच शक्य झालेले असून झुआरी नदीवरील नवीन पुलाचे शिल्पकार गडकरीच असल्याचे ते म्हणाले. पहिला चौपदरी पुल आता वाहतुकीस खुला होणार आहे. तर पुढील काही काळात याच प्रकल्पातील दुसरा चौपदरी पुल पूर्णत्वास येईल. सज्ज झालेल्या पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गोव्यातील लोकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. 29 रोजी उद्घाटन झाल्यानंतर 30 रोजी पुल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला होईल.
अशी असेल नवी वाहतुक व्यवस्था
या पुलावरील वाहतुक व्यवस्थेसंबंधी गुरूवारी संध्याकाळी अधिकृत अधिसूचना सरकारने जाहीर केली आहे. या अधिसुचनेनुसार नव्या चौपदरी पुलावरील चारपैकी एक रस्ता अवजड वाहतुकीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. पणजी ते मडगाव, वास्कोच्या दिशेने जाणारी अवजड वाहने या मार्गावरून वाहतूक करतील. उर्वरीत तीन रस्त्यांवर मडगाव व वास्कोहून पणजीच्या दिशेने जाणारी सर्व प्रकारची वाहने वाहतूक करू शकतील. जुना झुआरी पुल केवळ पणजीहून मडगाव, वास्को व इतर दिशांनी जाणाऱया बारा टन वजनापेक्षा कमी वजन असलेल्या वाहनांसाठीच वापरता येणार असून तो एकमार्गी वाहतुकीस खुला असणार आहे. झुआरी नदीवरील दुसऱया चौपदरी पुल पूर्ण होईपर्यंत ही व्यवस्था असणार आहे. दिशा फलक व इतर सर्व व्यवस्था सध्या पूर्ण करण्यात येत आहे.