पुणे / प्रतिनिधी :
माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेचा मी निषेध करतो. पवार आमचे विरोधी नेते असले तरी महाराष्ट्राची संस्कृती याप्रकारची नाही. राणे बंधूंसह खासदार संजय राऊत सारख्या वाचाळवीरांवर पक्षाने प्रसारमाध्यमाशी बोलण्यास बंदी घातली पाहिजे, असे मत भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
काकडे म्हणाले, नितेश राणे, निलेश राणे यांच्याबाबत पक्षातील वरिष्ठांकडे मी तक्रार करणार आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काही लोक पक्षापासून दुरावले जातात. याची काळजी घेतली पाहिजे. विरोधकांनी आम्ही सत्ता चालवताना काही चुकत असेल तर टीका टिप्पणी करावी. परंतु कोणत्याही नेत्याबाबत कुत्र्यापासून माकडापर्यंत, डुक्करापर्यंत खालच्या पातळीची टीका करणे योग्य नाही. कोणत्याही प्राण्याची नेत्यांना उपमा देण्याचे राहिलेले नाही इतका टीकेचा दर्जा घसरलेला आहे.
प्रसारमाध्यम लोकांना काय दाखवायचे ठरवतो त्यानुसार त्यांनी रोज सकाळी संजय राऊत, निलेश राणे यांच्याकडे जाणे बंद करावे. आमच्या पक्षातील वाचाळवीरांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास बंदी घालावी. त्यामुळे पक्षाला धोका निर्माण होऊ शकतो असे लेखी पत्र केंद्र व राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेत्यांना देणार आहे, असे त्यांनी सांगितले.