सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे विधान ः पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे कौतुक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले आहे. लवकरच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची प्रत हिंदीसमवेत देशातील अन्य भाषांमध्ये उपलब्ध होणार असल्याचे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. हा अत्यंत चांगला विचार असून यामुळे तरुणाईसह अनेक लोकांना मदत होणार असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे.
मुंबईत कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सरन्यायाधीशांनी न्यायालयाच्या निर्णयांना आर्टिफिशियल इंटेलिजेन्सद्वारे अन्य भाषांमध्ये अनुवादित करण्याचे संकेत दिले. निर्णय स्थानिक भाषेत उपलब्ध झाल्यास गावांमध्ये राहणाऱया लोकांना निर्णय समजून घेणे सोपे ठरणार असल्याचे उद्गार सरन्यायाधीशांनी काढले होते. न्यायालय पेपरलेस व्हावे हेच माझे उद्दिष्ट असल्याचे चंद्रचूड यांनी काही काळापूर्वी म्हटले होते.
व्यवस्थेतील त्रुटी झाकू नका
आम्हाला आमच्या व्यवस्थेतील त्रुटी झाकण्याची गरज नाही. तर या त्रुटी समोर आणून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जावा. न्यायालयाशी निगडित माहिती मिळण्याकरता उद्भवलेल्या समस्या दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.
लाईव्ह-स्ट्रीमिंगवर जोर
याचबरोबर सरन्यायाधीशांनी न्यायालयाच्या कामकाजाच्या लाइव्ह-स्ट्रीमिंगवर देखील जोर दिला आहे. कायद्यात स्वारस्य राखणारे शिक्षक आणि विद्यार्थी लाइव्ह-स्ट्रीमिंगद्वारे कुठल्याही खटल्याचे कामकाज पाहू शकतात. सुनावणीत काय घडते हे समजून घेत त्यावर चर्चा करू शकतात. जेव्हा तुम्ही लाइव्ह कुठल्याही मुद्दय़ावर चर्चा करता, तेव्हा समाजात किती अन्याय होतोय हे समजते असे उद्गार सरन्यायाधीशांनी काढले आहेत.
न्यायालयीन व्यवस्था लोकांसाठी
देशातील न्यायपालिका ही लोकांसाठी तयार करण्यात आली आहे. लोकांपेक्षा न्यायपालिका वरचढ ठरू शकत नाही युवा वकिलांनी स्वतःच्या कारकीर्दीत मोठी झेप घ्यावी आणि स्वतःचे स्वप्न साकार करावे असे सरन्यायाधीशांनी कार्यक्रमात उपस्थित युवा वकिलांना संबोधित करताना म्हटले आहे.
सर्वांना संधी देणे आवश्यक
युवा आणि नव्या वकिलांना जितक्या अधिक संधी दिल्या जातील, तितकाच वकिली पेशा समृद्ध होणार आहे. संधी काही विशेष लोकांपर्यंत मर्यादित ठेवल्या जाऊ नयेत, वंचित समुदायाच्या वकिलांना संधी देणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयात मी दररोज अर्धा तास युवा वकिलांची भूमिका ऐकत असतो, यातून देशाची नाडी समजत असल्याचे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.
बीसीएमजीचे न्यूज-ह्यूज चॅनेल
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बीसीएमजीच्या न्यूज-ह्यूज चॅनेलचीही सुरुवात केली आहे. न्यूज-ह्यूज हे देशातील पहिले बार कौन्सिल न्यूज चॅनेल आहे. युवा वकिलांसाठी बीसीएमएजीकडून तयार सिव्हिल आणि क्रिमिनल प्रॅक्टिस हँडबुकचेही त्यांनी प्रकाशन केले आहे. 50 हजार युवा वकिलांना या हँडबुकची प्रत मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे.
सरन्यायाधीशांच्या निर्णयाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे कौतुक केले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सरन्यायाधीशांनी सुचवलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या सेवेचा लाभ न्यायव्यवस्थेशी संबंधित असलेल्या लाखो लोकांना होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी एक क्लिप शेअर केली असून त्यात सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. भारतात अनेक भाषा असून त्या आपल्या सांस्कृतिक जिवंतपणात भर घालतात. भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रयत्न करत आहे. यामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसारख्या विषयांचा अभ्यासक्रम मातृभाषेतून शिकविण्याचा पर्याय देण्याचा समावेश असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.