पीएमओच्या वेबसाइटवर तपशील उपलब्ध
@वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एकूण 2.23 कोटी रुपयांची संपत्ती असून यातील बहुतांश बँकेमधील मुदतठेवींच्या स्वरुपात आहे. परंतु त्यांच्या नावावर कुठलीच स्थावर मालमत्ता नाही, मोदींनी गांधीनगरमधील स्वतःच्या हिस्स्यातील जमीन दान केली होती. पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार मोदींची रोखे, समभाग किंवा म्युच्युअल फंडमध्ये कुठलीच गुंतवणूक नाही, त्यांच्याकडे सोन्याच्या 4 अंगठय़ा असून त्यांची किंमत 1.73 लाख रुपये इतकी आहे.
मोदींची संपत्ती मागील वर्षाच्या तुलनेत 26.13 लाख रुपयांनी वाढली आहे. पीएमओच्या वेबसाइटनुसार मोदींकडे एकूण 2 कोटी 23 लाख 82 हजार 504 रुपयांची संपत्ती आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी एक निवासी भूखंड अन्य तीन जणांसोबत मिळून खरेदी केला होता. या भूखंडातील स्वतःचा हिस्सा मोदींनी यापूर्वीच दान केला आहे.
पंतप्रधानांकडे 31 मार्च 2022 रोजीच्या स्थितीनुसार 35,250 रुपये रोख स्वरुपात होते. तर पोस्ट ऑफिसमध्ये 9 लाख 5 हजार 105 रुपये नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट्सच्या स्वरुपात आहेत. 1,89,305 रुपयांची त्यांची जीवन विमा पॉलीसी आहे.
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील काही सहकाऱयांनी स्वतःच्या संपत्तीची घोषणा केली आहे. यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. राजनाथ यांच्याकडे 31 मार्च रोजीच्या स्थितीनुसार 2.54 कोटी रुपयांची चल संपत्ती तर 2.97 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. केंद्रीय मंत्र्यांमध्ये धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंधिया, आर. के. सिंह, हरदीप सिंह पुरी, पुरुषोत्तम रुपाला आणि जी. किशन रेड्डी, व्ही. मुरलीधरन, फग्गनसिंह कुलस्ते यांनी स्वतःच्या संपत्तीची घोषणा केली आहे. माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनीही मागील आर्थिक वर्षातील स्वतःच्या संपत्तीची घोषणा केली आहे. जुलै महिन्यात त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.